डिझेलची रायगडात तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी अलिबागच्या रेवस जेट्टीवर सापळा रचून एका टोळीला बेड्या ठोकल्या असून ३३ हजार लिटरचा मोठा साठा जप्त केला आहे. त्यामुळे समुद्रमार्गे डिझेलची तस्करी करणाऱ्या माफियांना दणका बसला आहे.
समुद्रमार्गे डिझेलची तस्करी होत असल्याची खबर रायगड पोलिसांना प्राप्त झाली होती. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक तयार केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत रेवस जेट्टीजवळ एक बोट समुद्रमार्गे डिझेल तस्करी करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार जेट्टी परिसरावर पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी पथकाला एक संशयित बोट किनाऱ्यावर थांबल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिगप्पा सरगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंदिप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजा पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.
उडवाउडवीची उत्तरे देताच मुसक्या आवळल्या
पोलिसांनी चौकशी करताच आरोपींनी उडवाउडवी उत्तरे देत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पथकाने बोटीची झाडाझडती घेतली असता डिझेलचा मोठा साठा आढळला त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळून बोट जप्त करण्यात आली. पोलिसांनी बोटीतील अलिबाग तालुक्यातील बोडणी गावातील गणेश कोळी, विनायक कोळी, गजानन कोळी यांच्यासह मूळ उत्तर प्रदेश व सध्या बोडणी गावात राहणाऱ्या मुकेश खबरदित निषाद अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.