महाराष्ट्रात जनतेने मतदान केले की ईव्हीएमने? अनपेक्षित निकालांवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालांवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात जनतेने मतदान केले की ईव्हीएमने मतदान केले हा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱयांकडून प्रमाणपत्र स्वीकारले. त्यानंतर मतमोजणी केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत याच महाराष्ट्राने आम्हाला आशीर्वाद दिले होते. लोकसभेच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट दिसत होती. विधानसभेचे निकाल मात्र सर्वांना अपेक्षित होते तसे आले नाहीत. यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमने किती प्रचार केला हे पाहावे लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आढावा घेतोय

आदित्य ठाकरे म्हणाले की, निष्ठावंत म्हणून जिथे काम केले तिथे आमचा विजय झाला आहे. पण महाराष्ट्रातील एकूण निकाल पाहता ते अपेक्षेप्रमाणे नाहीत असे सांगतानाच, संपूर्ण निकालाचा आपण आढावा घेत असून त्यावर लवकरच बोलू, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तांत्रिक चर्चा व्हायला हवी

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या पराभवावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या ठिकाणी लोक आपल्यासोबत आहेत असे शंभर टक्के वाटत होते, तिथेही पराभव झाला. तिथे तरी असा निकाल अपेक्षित नव्हता. त्यामुळे या सर्वांवर तांत्रिक चर्चा होणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.