
बँकांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावणाऱ्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असली तरी त्याला आर्थिक फरार घोषित करण्यात यावे अशी मागणी करणारी ईडी (अंमलबजावणी संचनालय) ची याचिका गेल्या सात वर्षांपासून सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
मेहुल चोक्सी व त्याचा पुतण्या हिरे व्यापारी नीरव मोदी हे पीएनबी बँक घोटाळय़ातील मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी पंजाब अॅण्ड नॅशनल बँकेला चुना लावत सुमारे 13 हजार कोटींचा कर्ज घोटाळा केला आहे. हा घोटाळा करून मेहुल चोक्सी हिंदुस्थानातून परागंधा झाला. या प्रकरणी मेहुल चोक्सीला आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित करण्यात यावे, तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी करत ईडीने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सात वर्षे झाली. मात्र अद्यापही सत्र न्यायालयात त्यावर निर्णय झालेला नाही. याबाबत ईडीच्या वकिलाने माहिती देताना सांगितले की, न्यायालय आमच्या अर्जावरील सुनावणी गेल्या सात वर्षांपासून पुढे ढकलण्यात आली आहे. मुळात अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यावर सुनावणी सुरू ठेवायला हवी होती व कारवाईचा निर्णय घ्यायला हवा होता, तर चोक्सीनेही याविरोधात हायकोर्टात अर्ज केल्याचे वकिलाने सांगितले.