
हिरे व्यवसायात नुकसान झाल्याने व्यावसायिकाने गेट वे येथील समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. संजय शहा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. संजय शहा हे हिरे व्यावसायिक होते. ते महालक्ष्मी मंदिर येथे राहायचे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांना हिऱ्याच्या व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे ते तणावात असायचे. आज सकाळी शहा हे वॉकिंगला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. शहा यांनी वरळी सागरी सेतू येथून टॅक्सीने तीन राऊंड मारले. त्यानंतर ते टॅक्सीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले. नॉर्थ कोर्ट कुलाबा येथून त्याने समुद्रात उडी मारली. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. शहा यांना समुद्रातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.