ध्येय मल्टिस्टेट पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट होणार! सहा कोटींची फसवणूक, चेअरमनसह सातजणांवर गुन्हा

सुमारे सहा कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या गुह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार मुंबईतील कंपनीला फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी नियुक्त केले आहे.

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून 112 ठेवीदारांचे पाच कोटी 78 लाख 65 हजार 90 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. नगर), संचालक नीलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव, ता. नगर), पूजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघेही रा. बोरूडे मळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी सुजाता नेवसे यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेडच्या पाइपलाइन रस्ता शाखेत दोन लाख रुपये मुदतठेव 14.40 टक्के व्याजदराने ठेवले. तसेच 19 ऑगस्ट 2023 रोजी आणखी एक लाख 75 हजार रुपये मुदतठेव ठेवली. दरम्यान, नेवसे यांनी 3 डिसेंबर 2023 रोजी चेअरमन भागानगरे यांना भेटून मुदतठेवीची मागणी केली. मात्र, पैसे नाहीत, रक्कम परत देऊ, असे सांगितले. त्यानंतरही नेवसे यांना वेळोवेळी पतसंस्थेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दरम्यान, ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड पतसंस्था बंद झाली असल्याचे नेवसे यांना 15 डिसेंबर 2023 रोजी समजले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  दरम्यान, या गुह्याचा तपास तोफखाना ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.