
धुळ्यात गणपती उत्सवाला गालबोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ओम पाटील आणि यश पाटील अशी मयत भावांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
धुळे शहरातील बिलाडी परिसरात राहणारे पाटील बंधू आपल्या एका मित्रासह गणपती विसर्जनासाठी तलावात गेले. मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले.
परिसरातील नागरिकांना तीन तरुण बुडत असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. मात्र त्याआधीच पाटील बंधूंचा बुडून मृत्यू झाला होता. तर त्यांच्या मित्राला वाचवण्यास यश आले आहे.
दोघा भावांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. दोघा भावांच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.