ध्रुव सितवालाची पुरस्काराची रक्कम वीरपत्नींना अर्पण

मुंबई स्पोर्ट्सच्या वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू ध्रुव सितवालाने आपली पुरस्काराची एक लाखाची रक्कम सीमेवर आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नींना अर्पण केली आहे. या सोहळ्यात ऍथलीट ऐश्वर्या मिश्रा हिलाही वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचा बहुमान देण्यात आला. पुरस्कार वितरणप्रसंगी ध्रुवने पुरस्कार रूपाने मिळालेली एक लाखाची रक्कम शहीद जवानांच्या वीरपत्नींच्या निधीसाठी अर्पण करून एक वेगळाच आदर्श क्रीडाजगतासमोर ठेवला.

मुंबई स्पोर्ट्सच्या या वार्षिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात अक्षन शेट्टी, कुणाल कोठेकर, रुतुजा खाडे, सोनाली बोराडे, भाग्यश्री सावंत, नताशा जोशी, मिलिंद वागळे यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण शेट्टी, आर. के. शेट्टी, प्रदीप गंधे, रविराज ईळवे, जय कवळी, उदय देशपांडे, जया शेट्टी, भास्कर सावंत आदी दिग्गज मंडळींनी या विजेत्यांचे सन्मान देऊन कौतुक केले.

या वेळी स्पोर्ट्स कोड तारक की मारक या परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक जय कवळी यांनी खेळासाठी स्पोर्टस् लॉबी तयार करणे ही काळाची गरज आहे आणि यासाठी स्पोर्टस् लॉबीनेच राजकीय पक्षांकडे पाठपुरावा करायला हवा. राजकीय पक्षांनी आपल्या वचननाम्यातही क्रीडा खेळांच्या भल्याचा, विकासाचा मुद्दा मांडायला हवे, असे परखड मत मांडले. स्पोर्ट्स कोड हे खेळाच्या प्रगतीसाठीच तयार करण्यात आले आहे आणि हे खेळासाठी तारक असल्याचे मत ज्येष्ठ कबड्डीपटू राजू भावसार यांनी मांडले.