विद्यमान भारतीय राष्ट्रीय बिलियर्ड्स विजेता ध्रुव सितवालाने त्याचाच देशबंधू आणि हिंदुस्थानचा अव्वल क्यूईस्ट पंकज अडवाणीवर 5-2 अशी मात करताना तिसरी एशियन बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली.
एसएबीएसएफ अॅपॅडमी, रियाध येथे शुक्रवारी झालेल्या बेस्ट ऑफ नाईन अंतिम फेरीत सितवालाने पहिली फ्रेम 103 अशी जिंकली. त्यानंतर सातत्य राखताना दुसऱया फ्रेमसह 2-0 अशी आघाडी घेतली. विक्रमी 27 जगज्जेतेपदे नावावर असलेल्या अडवाणीने 82 आणि 60 अशा ब्रेकसह पुढील दोन फ्रेम जिंकताना 2-2 अशी बरोबरी साधली. तथापि, सितवालाने आपला विजयी टच पुन्हा मिळवताना पाचवी फ्रेम 100-64 अशी खिशात घालताना 3-2 अशी पुन्हा आघाडी घेतली. अडवाणीने लढतीत टिकून राहण्याचा प्रयत्न केला. सहाव्या फ्रेमच्या सुरुवातीला 23 गुण मिळवले तरी एक चूक महागात पडली. सितवालाने संधीचे सोने करत 101 असा अनफिनिश्ड ब्रेकसह एकूण आघाडी 4-2 अशी वाढवली. आत्मविश्वास उंचावलेल्या सितवालाने सातव्या फ्रेममध्ये 62 गुणांसह आणखी एक ब्रेक जिंकताना एशियन बिलियर्ड्स विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या कारकीर्दीतील हे तिसरे एशियन बिलियर्ड्स जेतेपद आहे.