
>> धीरज कुलकर्णी
1940 ते 50 चे दशक भारतासाठी फार महत्त्वाचे होते. स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ जोमात होती. जगभरात दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग पसरलेले. महागाई, रेशनिंग यांचा तो काळ. भारतीय समाज जीवनात या काळात जे बदल झाले, त्यांचे पडसाद आर्थिक उदारीकरणाच्या 90 च्या दशकानंतरच थोडे अस्पष्ट झाले. नव्या शतकात त्या पिढीतील फार कुणी नसले तरी त्या काळाचा लेखाजोखा मांडणारे साहित्य आजही उपलब्ध आहे. ब्रिटिशांनी भारतीय ग्रामव्यवस्था, छोटे उद्योग संपवून टाकले. यंत्रयुगाने आपले पाय इथे रोवले. अमेरिकन मंदीचा काळ संपलेला. भारताच्या खेड्यापाड्यातून लोक रोजगारासाठी शहराकडे धावू लागले. साहित्यात, कलाकृतींमध्ये या सर्व बदलांचे पडसाद उमटले नसते तरच नवल.
मुंबई हे भारतातील मोठे शक्तिकेंद्र म्हणून उदयास आले. साहित्यातही मुंबईत या काळात अनेक नामवंत साहित्यिक निपजले. नवनवीन प्रकाशने मासिके अस्तित्वात आली आणि बंदही पडली. अर्थात, त्याची कारणे बरीच वेगवेगळी होती. नव्या शिक्षणपद्धतीमुळे आधुनिक विज्ञान, साहित्य यांच्याशी नव्या पिढीचा परिचय झालेला होता. विनोदाचीही एक नवीच जातकुळी अस्तित्वात येत होती. मराठी साहित्याला विनोदाचे वावडे नाही. चाळीसच्या दशकाअगोदरही श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांच्या विनोदांनी महाराष्ट्र भरभरून हसला होता. पण हा नवा विनोद चांगलाच बोचकारे काढणारा होता. नवीन पिढी ही मराठीत होत असलेल्या साहित्य व्यवहाराबाबत सजग होती. त्यातील विसंगती टिपून त्यावर विनोदाच्या माध्यमातून प्रहार करत होती.
असे एक सदर पु. ल. देशपांडे, अलुरकर, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी बडोद्याच्या `अभिरुची’ मासिकात काही काळ चालवले होते. या सदरासाठी त्यांनी घेतलेले टोपणनावही मजेशीर होते, पुरुषराज अळूरपांडे. या लेखाचा नंतर पुस्तकरूपाने संग्रह आला. तशाच पद्धतीचा विनोद मंगेश राजाध्यक्ष यांनी `वादसंवाद’ या सदरात त्याच मासिकातून लिहिला. सोबतीला द. ग. गोडसे यांनी काढलेली पूरक बहारदार चित्रे. मंगेश राजाध्यक्ष यांनी निषाद व गोडसेंनी शमा ही टोपणनावे धारण केली. या शमा व निषाद जोडीने 1943 ते 1953 मराठी साहित्यात भलतीच धमाल उडवून दिली होती. बराच काळापर्यंत हे शमा व निषाद कोण हे कोडे उलगडले नव्हते. बडोद्याचे पु. आ. चित्रे आणि विमल चित्रे या रसिक दाम्पत्याने 1940 च्या दशकात `अभिरुची’ या मासिकाची सुरुवात केली व सुमारे पुढील दशकभर ते यशस्वीपणे चालवले. मराठी साहित्य, कला यांना वाहिलेल्या या मासिकातील राजाध्यक्ष यांचे `वादसंवाद’ सदर भरपूर लोकप्रिय झाले.
परकीय राजवटीत, समाजातील शिक्षणाचे प्रमाण सुधारल्यानंतर, छपाई इत्यादी साधने बऱयापैकी प्रचलित झाल्यानंतर, अनेक नवीन लेखकांचा जसा उदय झाला, तसाच नवनवीन मतांचाही उदय झाला. त्यामुळे बरेचदा या मंडळींमध्ये वाद होत. `वादसंवाद’ या सदरामध्ये मराठी सारस्वत जगतामध्ये त्याकाळी घडत असलेली स्थित्यंतरे ही बारीक आणि तिरकस नजरेने टिपली आहेत. मात्र हे करताना कुणाला दुखावण्याचा उद्देश नसून साहित्य क्षेत्रात ज्या विसंगत प्रवृत्ती त्याकाळात शिरकाव करू पाहत होत्या, त्यांना अटकाव करण्याचा यात उद्देश दिसतो.
कलेला कसलेही प्रयोजन नाही. साहित्य, संगीत, चित्र आदी कलांचे एक ठरलेले माध्यम आहे आणि त्यातून त्या प्रकट अवस्थेत येतात. जो कलाकार त्याची मानसिक अवस्था, भवताल, काळ आदी गोष्टी या कलेतून समोर मांडू शकतो, त्याला भलत्याच कामाला जुंपणे अन्यायकारक आहे. याचे उदाहरण देताना निषाद लिहितात की, सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी काव्य, चित्रपट इत्यादी माध्यमांना वेठीला धरणे हे अगदी चूक आहे. अधिक धान्य पिकवा किंवा कुटुंब नियोजन करा हे जनतेला सांगण्यासाठी कला कशास वेठीला धरायची. त्यातून मग `फुले कपाशी, मुले उपाशी, फुले बाजरी, मुले गोजिरी’ असली विनोदी काव्ये जन्माला येतात.
या काळात लेखनातील शैलीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. शैलीदार लेखनाचा अतिरेक झाल्यानंतर भाषेतच बिघाड होऊ लागतो. त्यामुळे लेखनातील प्राण जातो की काय, अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होई. उदा. कोणत्याही कलेच्या समीक्षेसाठी तीच ती घासून गुळगुळीत झालेली, नेत्रदीपक, विस्मयकारक इत्यादी विशेषणे वापरणे. निषाद इथे म्हणतात, कोणी तरी आपले नियतकालिक व प्रकाशने उपसून असली `रत्ने’ बाहेर काढली पाहिजेत. म्हणजे लेखक आणि वाचक सावध होऊन भाषेचा खेळखंडोबा थांबेल. एकंदरीत सर्व प्रकारच्या कला याबद्दल असलेली लेखकांची आस्था या लेखनातून जाणवते. यामध्ये फक्त तिरकस टीका केली आहे असे नव्हे, तर उत्तम कलाकृती लोकांपुढे यायला हव्यात. त्यातील चांगल्या गोष्टींची चर्चा व्हायला हवी.
2003 साली ग. रा. कामत आणि मीना गोखले यांनी या लेखाचे संपादन करून त्याला मौजेतर्फे पुस्तकरूप दिले. `वादसंवाद’ हे अशा प्रकारे फक्त डॉक्युमेंटेशन म्हणून न राहता, या काळातही अशा प्रकारचे वेगळे प्रयोग केले जाऊ शकतात का, हे तपासण्याची एक प्रयोगशाळाच म्हणावी लागेल.
वाद संवाद
शमा व निषाद (द. ग. गोडसे, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष)
संपादन : ग.रा. कामत, मीना गोखले
प्रकाशक : मौज प्रकाशन 2003