वाचावे असे काही- उर्दूची आशयसंपन्नता

>>धीरज कुलकर्णी

एखाद्या व्यक्तीला कुठला छंद लागला की, ती व्यक्ती अगदी झपाटून जाते. ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ अशी त्याची अवस्था होते. डॉ. मधुकर धर्मापुरीकर हे तसे कामाला तर पाटबंधारे खात्यात लागले. परंतु उर्दू शेरोशायरी, उर्दू लिपी, जागतिक व्यंगचित्रे, सिनेसंगीत असे अनेक छंद त्यांनी जोपासले व त्यावर विपुल लेखन केले.

‘लज्जत’ या त्यांच्या नव्या पुस्तकात उर्दू शेर, गझल व त्यासंबंधीचे किस्से यांची खुमासदार माहिती वाचकांना मिळते. डॉ. धर्मापुरीकर यांचे गालीब, अकबर इलाहाबादी, डॉ. इकबाल हे आदर्श.

त्यांना उर्दू साहित्य व शेरोशायरी यांची गोडी कशी लागली याची हकिकत त्यांनी पहिल्या प्रकरणात सांगितली आहे. भाषेचा अभिमान हा तर प्रत्येकाला असणारच. आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी माय मराठीची स्तुती केली आहे, तर प्रसिद्ध उर्दू शायर दाग म्हणतात,

उर्दू है जिसका नाम, हमीं जानते है दाग
सारे जहाँ मे धूम हमारी जबा की है।

भाषेचा हा अभिमान बाळगण्याइतपत अभ्यास
डॉ. धर्मापुरीकर यांनी केला आणि त्यावर लेखनही केले.

उर्दू लिपीचे वर्णन करताना ते म्हणतात, उर्दू म्हणजे इतकी रेखीव की, जणू तळहातावरची मेंदीची नक्षीच. एका नुक्त्याचा म्हणजे टिंब देण्याचा फरकही वाक्याचे परस्परविरोधी दोन अर्थ घडवू शकतो. बावफा आणि बेवफा यांचा अर्थ भिन्न. त्यामुळे अर्थाची संगती लावताना वाचकाला काळजी घ्यावी लागते.

असे असल्यामुळे बरेचदा शायर शब्दांशी झोंबी करतात. त्याची अनेक उदाहरणे लेखक पुढच्या प्रकरणात स्पष्ट करतात.

उर्दू भाषेचा अभ्यास करताना लेखकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अर्थात या अडचणी व्यावहारिक नसून त्या अभ्यासाशी संबंधित होत्या.

अवघड शब्दांचे अर्थ समजून घेताना लेखकाची तारेवरची कसरत झाली. या वेळी त्यांच्या कामी आले ते त्यांचे ग्रंथ आणि उर्दूचे अनेक अभ्यासक मित्र. या किश्शांचा खुमासदार उल्लेख अनेक ठिकाणी लेखकांनी केला आहे.

डॉ. धर्मापुरीकर यांचा उर्दूप्रमाणेच इतरही अनेक विषयांचा अभ्यास. व्यंगचित्र आणि हिंदी सिनेसंगीत हे त्यापैकी काही. शेरोशायरी वाचत असताना त्यांना बरेच संदर्भ असेही मिळाले ज्यांचा अध्यात्मात, व्यंगचित्रात किंवा इतर शायरीत उल्लेख आहे. मग त्यांचा शोध घेणे आले. ते शोधताना कितीतरी किस्से झाले आणि नवीनच अर्थ सामोरे आले.

हा सगळा कष्टाचा, परंतु आनंददायी प्रवास डॉ. धर्मापुरीकर वर्णन करतात तेव्हा लेखकाला निराळा आनंद मिळतोच, शिवाय लेखकाच्या अभ्यासाची व्याप्तीही लक्षात येते.

गझल, शेर, उर्दू भाषा यात शुद्धलेखनाला महत्त्व आहे. थोडे इकडचे तिकडे झाले तरी शब्द, वाक्याचा अर्थ बदलून भलता घोळ होतो. देवनागरी लिपीत लिहितानाही लेखकाने हे पथ्य चांगलेच सांभाळलेले दिसते. अगदी शेर हा शब्दही शे‘र’ असा उच्चारानुसारच वापरलेला आहे. या नुक्त्याचा (टिंबाच्या) घोळामुळे जे विनोद उर्दू साहित्यात झालेत त्याचेही वर्णन त्यांनी केले

प्रेम, विरह, प्रेयसी, मद्य, मृत्यू हे उर्दू शायरीत वारंवार येणारे विषय. त्यांचा वेगवेगळ्या प्रकरणांनुसार लेखकाने परामर्श घेतला आहे. यातही एक शेर सापडल्यानंतर त्याच्याशी समान एखादे गाणे, किस्सा किंवा व्यंगचित्र यांचा तपशील आल्यामुळे एक वेगळाच अनुभव मिळतो. पुस्तकाच्या अखेरीस डॉ. धर्मापुरीकर यांनी अनुवादित केलेल्या तीन उर्दू लघुकथा आहेत. या वाचताना त्या मूळ मराठी वाटाव्यात इतका अनुवाद चांगला झाला आहे.

भाषांतर करत असताना या हृदयीचे त्या हृदयी असे होणे जरूर आहे. यासाठी भाषांतरकाराचे दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व हवे. त्याचप्रमाणे वाक्याचा जसाच्या तसा अनुवाद केला तर बरेचदा ते नीरस होते. मूळ लेखकाला जे म्हणायचे आहे त्या आशयाचे आपल्या भाषेतील वाक्य बरेचदा भाषांतराची खुमारी वाढवते.

डॉ. श्री. बा. जोशी यांच्या ‘गंगाजळी’ या संग्रहाप्रमाणे काही काम करावे अशी लेखकांची इच्छा होती. त्यामुळे यातील किस्से वाचताना अर्थातच ‘गंगाजळी’ची आठवण आल्याखेरीज राहत नाही. तरीही संग्रह म्हणून हा स्वतंत्र आहे आणि निश्चितच याचे मूल्य रसिकांनी जाणावे असे आहे.