धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना अपात्र धारावीकरांचे मालाडमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. आक्सासह परिसरातील गावकऱयांचा विरोध डावलून जमीन मोजणीसाठी गुरुवारी आक्सा गावामध्ये पोलीस बंदोबस्तात महसूल प्रशासनाचे अधिकारी येणार आहेत. या जमीन मोजणीला आपला विरोध दर्शवण्यासाठी उद्या, गुरुवारी सकाळी 11 वाजता श्री साई विद्यामंदिर, आक्सा गाव येथे गावकरी एकत्र येणार आहेत.
धारावीचा पुनर्विकास अदानीमार्फत करण्यात येणार आहे. अनेक धारावीकरांना अपात्र ठरवून त्यांचे पुनर्वसन मालाडमध्ये करण्यात येणार आहे. अशा प्रकारे कोळी बांधवांच्या जमिनी गिळण्याचे हे षड्यंत्र आहे. मालाडमधील मढ, भाटी, आक्सा, एरंगळ, मार्वे, मालवणी येथील गावकऱयांचा याला विरोध आहे. असे असतानाही महसूल विभागाचे अधिकारी उद्या जमीन मोजणीसाठी आक्सा येथे येणार आहे. या पार्श्वभूमीवर मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली गावकरी जमीन मोजणीस विरोध करण्यासाठी एकत्र येणार आहेत. यापूर्वीदेखील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांना गावकऱयांनी पिटाळून लावले होते.