स्थानिकांचा विरोध डावलून धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी अदानी समूहाच्या डीआरपीपीएल अर्थात धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीने गुरुवारी भूमिपूजनाचा घाट घातला होता. मात्र, धारावीकरांचे रौद्ररुप पाहून मिंधे सरकारची चांगलीच टरकली. धारावी बचाव आंदोलनाने भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देताच डीआरपीपीएलने गुरुवारी होणारा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला.
धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे अशा धारावीकरांच्या मागण्यांकडे पूर्णपणे डोळेझाक करून डीआरपीपीएलने धारावी पुनर्वसनासाठी माटुंग्यातील आरपीएफ मैदानात गुरुवारी भूमिपूजन करण्याचा घाट घातला होता. या कार्यक्रमाची कोणतीही अधिपृत घोषणा राज्य सरकार आणि डीआरपीपीएलकडून करण्यात आली नव्हती. यामुळे धारावीकर चांगलेच संतापले. धारावीकरांच्या मागणीबाबत कोणताही विकास आराखडा जाहीर नसताना डीआरपीपीएल कंपनी धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन कसे काय करू शकते, असा सवाल करत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलनाने दिला होता. धारावीकर बुधवारी सकाळपासूनच माटुंगा लेबर कॅम्प येथे लाक्षणिक उपोषणाला बसले होते. धारावीकरांचा आक्रमक पवित्रा पाहून डीआरपीपीएलने माघार घेत भूमिपूजनचा कार्यक्रम रद्द केला.
या लाक्षणिक उपोषणात माजी आमदार बाबुराव माने, आम आदमी पक्षाचे अॅड. संदीप कटके, पॉल राफेल, राष्ट्रवादीचे उल्लेश गजाकोष, हलिमा अंसारी, सीपीआयचे कॉ. नसिरुल हक, सीपीएमचे वसंत खंदारे, शैलेंद्र कांबळे काँग्रेसचे अब्बास हुसैन, दीपक खंदारे, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळवी, साम्या कोरडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि धारावीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धारावीच्या जागी दुसरी बीकेसी उभारण्याचा डाव
प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही. पात्रतेची अट रद्द करून घराच्या बदल्यात घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान धारावीतच मिळेल याची हमी देणारा शासन निर्णय अजून झालेला नाही. धारावीतील बहुतांश लोकांना अपात्र ठरवून त्यांना धारावीबाहेर हुसकावून लावण्याचा व धारावीच्या ठिकाणी दुसरी बीकेसी वसवण्याचा हा डाव असल्याचा आरोप आंदोलनाचे समन्वयक अॅड. राजेंद्र कोरडे यांनी केला.
यापुढेही भूमिपूजनाचा प्रयत्न हाणून पाडू
धारावी बचाव आंदोलनाच्या लाक्षणिक उपोषणाला शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी पाठिंबा दिला. शिवसेना धारावीकरांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी आहे. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच जेव्हा कधी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तेव्हा तो कार्यक्रम पूर्ण ताकदीने उधळून लावला जाईल, असा इशारा अनिल देसाई यांनी डीआरपीपीएल प्रशासनाला दिला.