धारावीचा पुनर्विकास नेमका कोणाच्या फायद्यासाठी? मिठागरांची 256 एकर जमीन देण्याच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील हा मोक्याचा भूखंड अदानीच्या घशात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आवाज उठवत आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुंबईतील या मोक्याच्या भूखंडावरून तसेच मिठागराच्या जमीनीवरून भाजप आणि मिंधे सरकारवर हल्ला चढवला आहे. मिठागारांची 256 एकर जमीन केंद्रातील मोदी सरकारने लाडक्या उद्योगपतीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या पूर्व उपनगरात पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पंपिंग स्टेशनसाठी कांजूरमार्ग येथील जागा 10 वर्षांसाठी महापालिकेला देण्यात येणार होती. तसेच केंद्र सरकारने प्रस्तावित कांजूरमार्ग मेट्रो डेपोविरोधात एक अनावश्यक खटला (तोही मिठागाराची जमीन असल्याचा खोटा दावा करत) दाखल केला. मात्र, मोट्रो कार डेपो स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाल्यावर तो खटला नंतर मागे घेण्यात आला. हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राच्या फायद्याचे होते. तरीही महाराष्ट्रविरोधी भाजपने ते होऊ दिले नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी चढवला आहे.

मिठागारांची जागा बिल्डरसाठी नो डेवलपमेंट झोन असतानाही ती जागा त्यांच्या लाडक्या बिल्डरच्या, उद्योगपतीच्या घशात घालण्याचा डाव भाजपकडून रचण्यात येत आहे. या निर्णयामुळे मुंबईचे आणि मुंबईकरांचे नुकसान होणार आहे. यावरून भाजपला मुंबईबाबत आकस आणि द्वेष असल्याचे दिसून येत आहे. धारावीतील “अपात्र” रहिवाशांच्या सोसायटी मुलुंड, वडाळा आणि कांजूरमार्ग येथे उभारण्यात येत असतील तर धारावीचा पुनर्विकास नेमका कोणासाठी केला जात आहे, असा परखड सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

धारावीतील कोणत्याही रहिवाशांना अपात्र ठरवू नये. तसेच मिठागाराच्या जमीनी कोणालाही देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत कोणत्याही मार्गाने भाजपला मुंबई तोडायची आहे. आता मुंबईतील धारावी ही मोक्याची जागा, मिठागारांची जागा भाजप त्यांचे हितसंबंध जपत लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचे प्रयत्न करत आहे, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधेले आहे.