मुलुंडकरांना विश्वासात न घेता धारावीसह विविध प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन (पीएपी) मुलुंडमध्ये करू नये. अशा प्रकल्पांमुळे मुलुंडकरांच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण होऊन त्याने संघर्ष निर्माण होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पग्रस्तासाठी प्रकल्प मुलुंडमध्ये राबवू नये. प्रकल्पग्रस्तांसाठी राबवण्यात येणारे सर्व प्रकल्प रद्द करा, या मागणीसाठी आज हजारो मुलुंडकरांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला.
‘आपण सारे मुलुंडकर’ या संस्थेच्या वतीने मुलुंड पूर्व येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले हेते. आज झालेल्या आंदोलनाला कामगार नेते राजन राजे, विश्वास उदगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पुनर्वसनासह विविध प्रकल्पग्रस्तांचे (पीएपी) पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येणार आहे. मुलुंडमधील सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या जागेवर हे प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातून प्रकल्पग्रस्तांसाठी 7 हजार 500 घरे उभारली जाणार आहेत. मात्र, हे करताना मुलुंडकरांच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येणार असून त्यातून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून मुलुंडमध्ये पीएपी प्रकल्पाविरोधात आंदोलन तयार झाले आहे. दरम्यान, आज झालेले आंदोलन शांतपणे झाले असले तरी यापुढचे आंदोलन आक्रमकपणे करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे, असे आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले.
पीएपी प्रकल्प हा मोठा घोटाळाच
मुलुंडमधील पीएपी प्रकल्पात येणाऱया रहिवाशांची यादी तयार नाही. कोण येणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे हा प्रकल्प एक घोटाळा आहे. यामध्ये ज्या लोकांना घरे दिले जाणार त्यांची पात्रता निकष हे आर अँड आर पॉलिसीनुसार आहे. या धोरणानुसार प्रकल्प पारीत होताना जी घरे आहेत ती ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी कधीच संपणार नाही, असा दावा आंदोलकांनी केला आहे.
मुलुंडमध्ये आधी डम्पिंग ग्राऊंड आले. आत पीएपी प्रकल्प, मग धारावी प्रकल्प. असे अनेक प्रकल्प लादले जात आहेत. हा अन्याय सहन केला जाणार नाही. पीएपी प्रकल्प मुलुंडच्या मूलभूत सुविधा आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेवर घाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून आज रस्त्यावर उतरून हा रोष व्यक्त केलेला आहे.
■ अॅड. सागर देवरे, सामाजिक कार्यकर्ते