अदानीमार्फत होऊ घातलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला स्थानिकांचा जोरदार विरोध असतानादेखील हा प्रकल्प कोणत्याही पद्धतीने रेटण्याचा अदानीचा आटापिटा सुरू आहे. गेल्या आठवड्यात गुपचूप भूमिपूजन उरकल्यानंतर अदानीने आता धारावीकरांची मने वळवण्यासाठी ‘डीआरपीपीएल’मार्फत धारावी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यापूर्वी जॉब फेअरदेखील भरवण्यात आला होता. अदानीने कितीही प्रयत्न केले तरी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही यावर धारावीकर ठाम आहेत.
धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, धारावीकरांना मोफत 500 चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, अशा धारावीकरांच्या मागण्या आहेत. अदानीमार्फत होणाऱ्या पुनर्विकासाला धारावीकरांचा जोरदार विरोध असून स्थानिकांनी अनेकदा सर्व्हे उधळून लावला. दुसरीकडे मिंधे-भाजप सरकार हा प्रकल्प अदानीच्या घशात घालून हजारो धारावीकरांना अपात्र ठरवून त्यांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवर करण्याच्या तयारीत आहे.
धारावीकरांच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागू नये यासाठी धारावीतील जनता आणि धारावी बचाव समितीची दिशाभूल करत डीआरपीपीएलने ऐन गणेशोत्सवात गुपचूप भूमिपूजन उरकले होते. धारावीकरांची मने जिंकल्याशिवाय हा प्रकल्प पुढे नेणे अशक्य आहे. त्यामुळे अदानीने धारावीकरांची मने जिंकण्यासाठी आपल्या पीआरला कामाला लावले आहे. जॉब फेअर, धारावी प्रीमियर लीग असे उपक्रम राबवून धारावीकरांची मने वळवण्यासाठी अदानीचा आटापिटा सुरू आहे.