![carrom tournament](https://www.saamana.com/wp-content/uploads/2022/08/Untitled-design28-696x447.png)
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित खेळ महोत्सवात 8 आणि 9 फेब्रुवारीला धारावी आणि वडाळा विधानसभा क्षेत्रात महिला क्रिकेट, बुद्धिबळ आणि कॅरम या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांची क्रिकेट स्पर्धा धारावी येथील मनोहर जोशी महाविद्यालयात 9 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या संघाला 30,000 रुपये, तर उपविजेत्यांना 15,000 रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही रोख पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे रविवारीच दादर येथील शारदा मंगल कार्यालयात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दोन सत्रांमध्ये विभागण्यात आल्या असून सकाळच्या सत्रात 6, 8, 10, 12 आणि 14 वर्षांखालील गट सहभागी होतील, तर दुपारच्या सत्रात 7, 9, 11, 13, 15 वर्षांखालील गट आणि खुला गट (पुरुष व महिला) खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत विजेत्यांनाही रोख पुरस्काराने गौरविले जाणार आहे. याच सभागृहात कॅरम स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. खेळ महोत्सवात आयोजित स्पर्धा फक्त दक्षिण-मध्य मुंबई विभागातील म्हणजेच अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, शीव-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम येथील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. या स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी दिलीप पाणिग्रही (9769113120) आणि पवनराज महाडिक (9152167560) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.