अदानीची धोकेबाजी जाहीरपणे उघड करणार, ‘धारावी बचाओ’ आंदोलनाची आज भव्य सभा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मुंबईतील राज्य सरकार, मुंबई महापालिका, कलेक्टर लॅण्ड आणि मिठागरांचे सुमारे दोन हजार एकर भूखंड घशात घालण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. अदानीची ही धोकेबाजी जाहीरपणे उघड करू, असा इशारा देत धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे यासाठी सोमवारी संध्याकाळी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूह धारावीतील 550 एकरची जागा ताब्यात घेणार असून धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबईतील सुमारे 2 हजार एकरच्या जागा आणि भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहेत. धारावीचा पुनर्विकास आर्थिक घोटाळा करणाऱ्या अदानी समूहाने करू नये, अशी ठाम भूमिका धारावीकरांनी घेतली, असून अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याने हा प्रकल्प धारावीकरांवर जबरदस्तीने लादण्यात येत आहे. त्यासाठी अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) कंपनीने सर्वेक्षण सुरू असून लोक या सर्वेक्षणात सहभागी होत असल्याचा आणि अदानीच्या पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा असल्याचा बनाव करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाचा खोटारडेपणा, धोकेबाजी, फसवणूक, दबाव, दादागिरी आणि सरकारबरोबर असलेली मिलीभगत याचा पर्दाफाश करण्यासाठी धारावी मेन रोडवरील अभ्युदय बँकेसमोर, सोमवार, 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने प्रचंड जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेसह धारावी बचाव आंदोलन, विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था अशा एकूण 18 संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अदानीच्या समर्थनार्थ भिकाऱ्यांची मदत

अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सर्व धारावीकरांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे सर्वेक्षण धीम्या गतीने सुरू असतानाही सर्वेक्षणाचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. त्याचबरोबर प्रकल्पाला लोकांचा विरोध नाही हे दाखवण्यासाठी चक्क माहीम दर्ग्याजवळील भिकाऱ्यांना एसी गाडय़ांनी धारावीत आणले गेले आणि अदानीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी द्यायला लावून त्यांचे व्हिडीओ आणि पह्टो काढण्यात आले. मात्र, अदानीचा  बनाव धारावीकरांना माहीत असून  भूलथापांना ते बळी पडणार नाहीत, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक बाबुराव माने यांनी दिला.

या आहेत मागण्या…

  • धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लान जाहीर करा.
  • घराच्या बदल्यात 500 चौरस फुटांचे घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान धारावीतच मोफत मिळाले पाहिजे.
  • मुंबई महापालिकेच्या इस्टेट डिपार्टमेंट (मालमत्ता विभाग) च्या चाळी आणि इमारतीतील घरांच्या बदल्यात 753 चौरस फुटांपर्यंतची घरे मोफत द्या.
  • व्यावसायिक गाळय़ांच्या बदल्यात, त्यांच्या वापरात आहे तितकी जागा मोफत द्या.
  • कुंभारवाडय़ाचे पुनर्वसन धारावीतच करा.