साहेब… आम्हाला शिकायचंय, शिकू द्या! रातोरात शाळा स्थलांतरित; विद्यार्थी, गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

धाराशिव जिल्ह्यातील कळब तालुक्यातील बोरगांव (बुद्रुक) येथील 5 वी ते 7 पर्यंतची ज्ञानसागर एज्यूकेशन लातूर या विद्यालयाने गावकरी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अंधारात ठेवून रातोरात बाह्य जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. त्यामुळे 106 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत असून शेकडो विद्यार्थी शाळाबाह्य झाली आहेत. शाळा स्थलांतर करू नये, याबाबतचे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देवूनही विद्यालयाच्या व्यवस्थापनाने आदेशाला केराची टोपली दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. स्थलांतर होऊ नये, यासाठी विद्यार्थी, पालक, गावकरी यांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले आहे.

तालुक्यातील बोरगांव बुद्रुक या शाळेसाठी गावकऱ्यांनी एक एकर मोफत जागा दिली असून 1997 पासून ते 15 जून 2024 पर्यंत माध्यमिक शाळा सुरू होती. नेमके शाळा सुरू होताच शाळेच्या व्यवस्थापनाने आपला घाशा गुंडाळल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेत बोरगांव बुद्रुक, पिंपरी शि, रायगव्हान, जायफळ या गावातील 106 विद्यार्थी शिक्षण घेत होते. लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग यांच्याकडे विद्यालय स्थलांतर होणार असून तत्काळ स्थलांतर थांबवावे, असे ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव घेवून मागणी केली होती. आ. कैलास पाटील यांनीही शिक्षण विभागाला पत्र देवून स्थलांतर होऊ देवू नये, जिल्हा परिषदेला कळविले होते. मात्र, विद्यालयाच्या व्यवस्थापनाने रातोरात विद्यालयाचे लातूर जिल्ह्यात स्थलांतर करून लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.