धाराशीव, सांगली, कोल्हापूर व पुणे तीन गटांत उपांत्य फेरीत

भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत धाराशीव, सांगली, कोल्हापूर व पुणे यांनी प्रत्येकी तीन गटांत उपांत्य फेरी गाठली. ठाणे, सातारा व मुंबई उपनगरने प्रत्येकी एका गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित स्पर्धेत किशोर गटात सांगली, सातारा, धाराशीव व कोल्हापूर तर किशोरी गटात पुणे, धाराशीव, ठाणे व सांगली यांनी उपांत्य फेरी गाठली. पुरुष गटात पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर व सांगली तर महिला गटात धाराशीव, कोल्हापूर, ठाणे व पुणे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सांगलीने मुंबईला नमविले

महिला गटात पुण्याने नाशिकला 16-15 असे एका गुणाने नमविले. मध्यंतरास नाशिकने 10-9 अशी आघाडी घेतली होती. नंतर मात्र पुण्याच्या प्रियांका इंगळेने (1.40, 2.30 व 6 गुण) हिने अष्टपैलू कामगिरी करत विजय खेचून आणला. नाशिककडून प्रगती भोपेने (7 गुण) लढत दिली.

पुरुष गटात मुंबई उपनगरने ठाण्यास 16-15 असे एका गुणाने हरवले. मुंबई उपनगरकडून ओंकार सोनवणे (2.10,1.30 मि. व 5 गुण) तर ठाणेकडून राज संकपाळ (1.30 मि. व 3 गुण) यांनी कामगिरी केली. निर्धारित वेळेत 16-16 अशी बरोबरी झाल्यानंतर जादा डावात सांगलीने मुंबईवर 28-26 अशी दोन गुणांनी मात केली. मुंबईकडून वेदांत देसाई (6 गुण व तीन डावात प्रत्येकी 1 मिनिटे संरक्षण) व सांगलीकडून अभिषेक केरीपाळे (1.10, 1 मि. व 7 गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.

अन्य निकाल

पुरुष ः कोल्हापूर वि. वि. सोलापूर 21-18 3 गुणांनी, पुणे वि. वि. अहिल्यानगर 14-11 एक डाव 3 गुणांनी.
महिला ः धाराशीव वि.वि. सांगली 10-7 एक डाव 3 गुणांनी, कोल्हापूर वि. वि. सोलापूर 18-9 नऊ गुणांनी, ठाणे वि.वि. मुंबई 19-13 एक डाव 6 गुणांनी.

असे होणार उपांत्य सामने

किशोर ः सांगली विरुद्ध सातारा, धाराशीव विरुद्ध कोल्हापूर
किशोरी ः पुणे विरुद्ध धाराशीव, ठाणे विरुद्ध सांगली.
पुरुष ः पुणे विरुद्ध कोल्हापूर, मुंबई उपनगर विरुद्ध सांगली.
महिला ः धाराशीव विरुद्ध कोल्हापूर, ठाणे विरुद्ध पुणे.