मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना अज्ञात गुंडांची सलामी! धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार

 ‘खेकडा’फेम मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर मध्यरात्री हवेत गोळीबार करण्यात आला. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना अज्ञात गुंडांनी सलामी देऊन कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान, हा गोळीबार केला की करवून घेतला यावरून सध्या धाराशीवमध्ये चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी अज्ञात गुंडांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचा सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क्स हा खासगी साखर कारखाना आहे. कारखान्याच्या जवळच धनंजय सावंत यांचे घर आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सावंत यांच्या घरासमोर हवेत गोळीबार केला. गोळीबार करून दोघेही दुचाकीवर भरधाव निघून गेल्याचे सावंत यांच्या सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात गद्दारीची विषवल्ली आपणच लावल्याचे अभिमानाने सांगणारे तानाजी सावंत यांनी आपल्याच सरकारच्या बुडाखाली चूड लावला आहे. त्यामुळे ते सध्या मिंध्यांच्या नजरेतून उतरले आहेत. मध्यंतरी वाचाळ विधाने केल्यावरून मिंध्यांनी वर्षा बंगल्यावर सावंतांची सालटी काढली होती. आता पुन्हा मिंध्यांच्या नजरेत येण्यासाठीच हा सगळा खटाटोप घडवून आणण्यात आला असावा अशी जोरदार चर्चा धाराशिवात आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आज धाराशिवात आहेत. त्यांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येलाच हा गोळीबार झाला आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधडय़ा उडाल्या.

सीसीटीव्ही फुटेजचा धांडोळा

धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची तक्रार त्यांच्या सुरक्षा रक्षकाने अंभी पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. पोलिसांनी स्थळभेटही दिली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा धांडोळा घेण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनीही जातीने हवेत झालेल्या गोळीबाराची पाहणी केली.

धनंजय सावंत यांच्या घरासमोर रात्री हवेत गोळीबार झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनास्थळी तीन रिकामी काडतुसे सापडली आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. – गौहर हसन, अप्पर पोलीस अधीक्षक, धाराशीव