किस्से आणि बरंच काही – मी पाहिलेला गावसकर

>> धनंजय साठे

’मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ आणि ’लिटल मास्टर’ अशी अनेक बिरुदं भूषवणारे हिंदुस्थानातच नाही, तर आंतरराष्ट्रीय ािढकेटची शान व एकेकाळचे आघाडीचे फलंदाज, हिंदुस्थानी चमूचे माजी कर्णधार अर्थात
‘द वन अँड ओन्ली’ सुनील गावसकर…

तर 1976 सालचा तो दिवस उजाडला होता. तेव्हा हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड ही टेस्ट मॅच बंगळुरूमध्ये चालू होती. तेव्हा आम्ही बंगळुरूमध्येच राहायला होतो. त्या काळी तीन दिवसांच्या खेळानंतर एक दिवसाचा रेस्ट डे असायचा. ती प्रथा कालांतराने संपुष्टात आली. तर हे सगळं सांगण्यामागचा हेतू इतकाच की, त्या रेस्ट डेच्या संध्याकाळी साक्षात सुनील गावसकर आमच्या घरी जेवायला येणार होते. हो, बरोबर वाचलं तुम्ही! ‘आज सकाळपासून गेली आईची घाई उडून’ हे गाणं अगदी फिट बसावं असा माहौल होता साठेंच्या घरात. माझी आई माहेरची राजाध्यक्ष. त्यामुळे सगळा भर त्या दिवशी सारस्वत पद्धतीच्या स्वयंपाकावर होता. भरलेले पापलेट, बांगडय़ाचं कालवण, सुकं मटण, गरम गरम चपात्या, वाफाळलेला भात आणि ज्या शिवाय कोणत्याही सारस्वताचे जेवण पूर्ण होऊ शकत नाही ती सोलकढी. सगळं काही स्वप्नवत वाटावं असं होतं.

हिंदुस्थानचा आघाडीचा, लोकप्रिय स्टार क्रिकेटर आमच्याकडे जेवायला का यावा? असा विचार येणं स्वाभाविक आहे. तर त्याचं उत्तर म्हणजे माझ्या वडिलांचे बालमित्र डॉ. शशी परचुरे! दादरच्या किंग जॉर्ज शाळेच्या परिसरात त्यांचं हॉस्पिटल होतं. शशीकाका गायनॅकलॉजिस्ट होते. डॉ. परचुरे आणि गावसकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते.

एके दिवशी शशीकाकांना भेटायला सुनील गावसकर आले होते. अनायसे तेव्हा बाबा पण शशीकाकांना भेटायला गेले होते. तेव्हा शशीकाकांनी बाबांची ओळख गावसकरांशी करून दिली. माझे वडील प्रचंड क्रिकेटवेडे होतेच, त्यात ते स्वत खेळले असल्यामुळे क्रिकेट खेळाची उत्तम जाण होती. तर अशी ही पहिली ओळख, पण तिचं रूपांतर मस्त मैत्रीत झालं. थँक्स टू शशीकाका! ?ही झाली पार्श्वभूमी. तर घरी स्वयंपाक जोरात चालू होता. गावसकरांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ही बातमी कोणालाच सांगितली नव्हती. अगदी शेजाऱयांनाही पुसटशी कल्पना नव्हती. बंगळुरूमध्ये तेव्हा स्वतंत्र बंगले असायचे. त्यामुळे त्यांचं स्वागत करणं सोपं गेलं. दिवसभराच्या धावपळीनंतर आई शांतपणे एकदाची खुर्चीत बसली तेव्हा आम्हीच सुटकेचा श्वास सोडला. ठरलेल्या वेळी बाबा वेस्ट एण्ड हॉटेलवर पोहोचले, जिथे त्या काळी हिंदुस्थानची टीम राहत होती. गावसकरांना पटकन गाडीत घेतलं आणि आमची गाडी भरधाव वेगाने घराच्या दिशेने निघाली. त्या वेळी मी चौथीत होतो. बाबा गावसकरांना घेऊन आत आले, बसले. मी तोंडाचा ‘आ’ वासून त्यांच्याकडे एकटक बघत राहिलो. त्यांनी सहज मला विचारलं, “काय रे, क्रिकेट खेळतोस का?” मी तंद्रीतून बाहेर येऊन “अं… हो…” म्हणालो. “तुझा स्टान्स दाखव मला” असं साक्षात ािढकेटचे सर्वेसर्वा गावसकर माझा स्टान्स बघण्यास इच्छुक आहेत, त्या वेळी मला भारी वाटलं होतं. मी लगेच त्यांना बॅट धरून दाखवली आणि त्यांनी बारीक तांत्रिक चुका, ग्रिप वगैरे शिकवलं. काय तो क्षण होता! पण हेल्मेटचा वापर न करता जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजांना पाणी पाजणारा महान फलंदाज आमच्या घरात आमच्या हॉलमध्ये माझी बॅटची ग्रिप कशी असावी हे शिकवत होता हे माझं थोर भाग्यच समजतो मी.

त्या काळात मोबाइल फोन नव्हते. नाहीतर प्रत्येक क्षण कैद केला असता. ही खंत अजूनही मनात घर करून आहे. गप्पांमध्ये माझा सहभाग नसला तरी दुरून आपल्या हिरोला डोळे भरून पाहण्यात पण एक वेगळी मजा होती. गावसकरांनी त्या वेळी बरेच गमतीशीर किस्से शेअर केले होते. तेव्हा बाबांनी एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं होतं. गावसकरांनी ते घेण्यास साफ नकार दिला होता. कारण? पुस्तकाची प्रिंट छोटय़ा अक्षरांतली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, बारीक प्रिंट असलेली कोणतीच पुस्तकं किंवा मासिकं वाचायची नाहीत. कारण आघाडीच्या फलंदाजांचा खेळाचा मर्मच त्याच्या रिफ्लेक्सेसवर असतो. डोळे फार महत्त्वाचे असतात आणि त्यांची निगा राखणे हा प्रत्येक क्रिकेटरचा जणू धर्मच असतो. धुरापासून स्वतला दूर ठेवायचं, कॅमेऱ्यामध्ये कधीच पाहायचं नाही. कारण कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. आयुष्यातले महत्त्वाचे धडे होते ते. अशीच नाही गावसकर, तेंडुलकर थोर व्यक्तिमत्त्वं बनत. घोर तपस्या आणि त्याग याशिवाय माणूस मोठा होत नसतो.

गप्पा मारता मारता मोर्चा डायनिंग टेबलकडे वळला. टेबलावरचे पदार्थ पाहून गावसकर साहेब चांगलेच खुश झाले. तब्येतीत जेवले. आमच्या कुटुंबासाठी ‘गावसकर घरी येता तोचि दिवाळी दसरा’ असं काहीसं झालं होतं.

बंगळुरूत कसोटी सामना असला की, मी आणि बाबा तयारच असायचो. सकाळी 7च्या सुमारास सामन्याच्या दिवशी घरातला टेलिफोन वाजायचा. दुसऱया बाजूने गावसकर साहेब “तुमचे पासेस मी रिसेप्शनवर ठेवतोय, प्लीज कलेक्ट करा” असं स्वत बाबांना कळवायचे आणि पॅव्हिलियनचे म्हणजे पूर्वी समालोचक बसायचे त्याच बाजूच्या सीटवर बसून मी असंख्य कसोटी सामन्यांचा आनंद घेतला आहे. आमच्याकडे तीन पासेस असायचेच. बाबांच्या अनेक मित्रांपैकी आलटून पालटून कोणीतरी काका आमच्यासोबत सामने पाहायला असायचेच.

महाराष्ट्र मंडळ बंगळुरूचा सचिव असताना मी एक प्रस्ताव मांडला की, येत्या हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या वेळी आपल्या खेळाडूंना मंडळात बोलावून गप्पांचा कार्पाम करायचा आणि त्यांचा सत्कार करायचा. बिनविरोध माझा प्रस्ताव मंजूर झाला होता. जेव्हा हिंदुस्थानी टीम बंगळुरूला पोहोचली तेव्हा मी, बाबा आणि मंडळाचे अध्यक्ष अभय दीक्षित असे वेस्ट एंड हॉटेलवर पोहोचलो. गावसकरांना भेटून आमचा प्रस्ताव पुढे ठेवला. आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कारण गावसकरांनी स्वत पुढाकार घेऊन संदीप पाटील, चंद्रकांत पंडित आणि किरण मोरे या सगळ्यांकडून होकार मिळवला. त्या दिवशी मंडळाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते ब्लॉक झाले होते. अर्थात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. गावसकर हे किती मोठे ािढकेटर होते यावर बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं ठरेल. त्यांचे मैदानावरचे पराम जगजाहीर आहेत. म्हणून मैदानाबाहेरचे मी पाहिलेले, अनुभवलेले सुनील गावसकर आज तुमच्यासोबत शेअर करतोय.