किस्से आणि बरंच काही – निखळ मैत्रीचं नातं

>> धनंजय साठे

नाव, प्रसिद्धी, पैसा, लोकांचे प्रेम आणि अनेक मानसन्मान मिळवूनही तुमच्या आमच्यातली, आपल्या मध्यमवर्गीय मुळांना घट्ट धरून राहणारी किशोरी शहाणेसारखी कलाकार जिच्याशी माझं निखळ मैत्रीचं असलेलं नातं आजही कायम आहे.

दुपार सरून संध्याकाळ सुरू झाली होती आणि मी जुहूच्या किशोर कुमार गांगुली मार्गावर वळलो. एक-दोन जणांना पत्ता विचारत अखेर मला हव्या त्या स्थळी पोहोचलो. कपाळावरचा घाम रुमालाने टिपत दारावरची बेल वाजवली. दार उघडणाऱ्या त्या मुलाला जणू आधीच सांगण्यात आलं होतं अशा थाटात त्याने मला शेजारच्या खोलीत बसवलं. चहा-कॉफीची विचारणा केली आणि “मॅडम अभी आयेगी’’ असं सांगून तो निघून गेला. खोलीभर माझी नजर फिरवली. अतिशय कल्पकतेने ती सजवलेली होती. तेवढ्यात…‘हॅलो मि. धनंजय’ असा दरवाजाच्या दिशेने आवाज आला. झपकन उठून उभा राहात मी शेकहँडसाठी हात पुढे केला. माझ्या समोर होती महाराष्ट्राची आणि देशभरातली सुप्रसिद्ध, आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री किशोरी शहाणे विज.

एका सिनेमाच्या प्रोजेक्टची चर्चा करण्यासाठी ही भेट होती. मी बोलायला लागलो आणि पाचव्या मिनिटालाच मला किशोरीने थांबवलं…“तुम्ही अमिताभ बच्चन यांचे फॅन आहात का?’’ मी आश्चर्यचकित झालो. कारण हो, मी खरंच अमिताभ बच्चन यांचा ‘येडा फॅन’ होतो, पण प्रश्न हा होता की, हे किशोरी यांना कसं कळलं? तसं मी भाबडेपणाने त्यांना विचारलंही. त्यावर त्या म्हणाल्या की, “माझा एकूण वावर, बोलणं, सोफ्यावर बसण्याची लकब हे त्यांच्या लक्षात आलं. जणू प्रति अमिताभच वाटलो म्हणून मला बोलता बोलता मध्येच थांबवून त्यांनी आपली शंका निरसन करून घेतली. त्यांनी सहजपणे त्यांचं मत मांडलं होतं, पण माझ्यासारख्या ‘बच्चन वेडय़ा’साठी ती अनमोल पावती होती. मग काय… मी लगेच बच्चन साहेबांच्या आवाजात त्यांना “तहे दिला से शुक्रिया’’ केलं. किशोरीने उत्स्फूर्तपणे माझ्या वाक्याला दाद देत “है न’’ असं बच्चन स्टाइलमध्ये प्रत्युत्तर दिलं आणि त्या छोटय़ाशा, पण अविस्मरणीय भेटीपासून गोड मैत्रीत रूपांतर झालं, ते आज अधिक प्रगल्भ होत गेलेलं आहे. यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. निखळ मैत्रीचं एक स्वच्छ नातं आता मिळणं जरा दुर्मिळच!

डिव्हाईन चाइल्ड कॉन्व्हेंट शाळा, त्यानंतर मिठीभाई कॉलेजमधून वाणिज्य शाखेतली पदवी. तिथे शिक्षण घेत असताना किशोरी यांना ‘मिस मिठीभाई’ हा किताब मिळाला होता. अकरावीत असताना ‘प्रेम करूया खुल्लमखुल्ला’ या चित्रपटाद्वारे चंदेरी पडद्यावर आगमन झालं. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अशा मातब्बर कलाकारांबरोबर पर्दापणात काम करायला मिळणं हे भाग्यच म्हणायला हवं. तसं नववीमध्ये असताना ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर किशोरी यांचं पदार्पण झालं होतंच. ‘प्रेम करूया खुल्लमखुल्ला’च्या चित्रीकरणादरम्यान ‘माझा पती करोडपती’चंही चित्रीकरण चालू झालं होतं. वाणिज्य शाखेची पदवी हातात पडेपर्यंत किशोरी जवळपास वीसेक चित्रपटांत नायिकेच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर ‘एक डाव धोबीपछाड‘, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’ असे पब्लिकच्या पसंतीला उतरलेले अनेक चित्रपट त्यांनी केले. ‘मोहेंजोदारो’ आणि ‘सिंधम’ हे हिंदी चित्रपटही केले. ‘मोरूची मावशी’ हे त्यांचं गाजलेलं नाटक, तर मालिका क्षेत्रात ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘दामिनी’, ‘जाऊबाई जोरात’ अशा लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं स्थान भक्कम केलं. हिंदी मालिकांमध्येसुध्दा अभिनय क्षमतेचा ठसा उमटवला. ‘गुम हैं किसी के प्यार मे’, ‘कैसे मुझे तुम मिल गये’ या लोकप्रिय मालिकांव्यतिरिक्त ‘मराठी बिग बास’मध्येही भाग घेतला आणि तरुण स्पर्धकांना टफ फाइट दिली होती.

एक उत्तम व्यक्ती म्हणून किशोरी शहाणे विज ही माझ्या लेखी नेहमीच खूप वरच्या पायरीवर राहिल्या आहेत. ज्या काळात मी साम मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग सांभाळत होतो तेव्हा किशोरी आणि तिचे पती दीपक बलराज विज यांची ‘मधुरा’ कार्यक्रमात मुलाखत झाली होती. मुलाखत आटपल्यावर ते दोघे हक्काने माझ्या केबिनमध्ये येऊन मला भेटले होते आणि गरमागरम मिसळीचा आस्वाद घेतला होता. आज मागे वळून पाहताना किशोरी त्यांच्या यशाचं श्रेय आई, वडील, बहीण, नवरा दीपकजी, मुलगा बॉबी यांना देते. कारण या जवळच्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय त्या इथवर पोहोचू शकल्या नसत्या असं त्यांचं ठाम मत आहे.

आज यशाच्या शिखरावर विराजमान असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. मागे एकदा दीपकजींना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा चक्क किशोरी घरी होत्या आणि त्यांनी मला स्वत चहा बनवून दिला होता. किशोरी स्वत योग्य आहार, खाण्यावर नियंत्रण, रोजचा व्यायाम, योगासन अतिशय शिस्तीने पाळतात. वेळ मिळेल तसा नृत्याचा सराव असतोच. इतर वेळी पती आणि मुलासोबत वेळ घालवणं, त्यांच्या फार्म हाऊसवर विकएण्ड एन्जाय करणं, त्यांना आवडतं. इतकं नाव, प्रसिद्धी, पैसा, लोकांचे भरभरून प्रेम आणि अनेक मानसन्मान मिळवूनही तुमच्या आमच्यातली, आपल्या मध्यमवर्गीय मुळांना घट्ट धरून राहणारी किशोरीसारखी कलाकार सापडणं अशक्य आहे. आनंद या गोष्टीचा आहे की, मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा मी “आये, साला आपुन बोलता हैं’’ असं म्हटल्यावर समोरून किशोरी “ओये, क्या बोलता हैं…’’ असा आवाज आला. म्हणजे थोडक्यात काहीच बदललेलं नाही.

[email protected]