आकाच्या आकाचा खेळ खल्लास, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा; तब्बल 82 दिवसांनंतर नैतिकतेची उचकी

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाच. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 82 दिवसांनंतर नैतिकतेची उचकी लागली, तर मुंडे मात्र म्हणाले, तब्येतीच्या कारणाने राजीनामा देतोय. कारण काही असेल पण गेले काही महिने गाजणाऱया आकाच्या आकाचा खेळ खल्लास झाला हे मात्र खरे.

धनंजय मुंडे यांनी आपले पीए आणि स्वीय सहाय्यक या दोघांच्या माध्यमातून आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला. या दोघांनी आज मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मुंडेंच्या राजीनाम्याची प्रत दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना त्यासंदर्भात माहिती दिली. मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यपालांकडून हा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाने गेले दोन महिने रान उठवले होते.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींविरुद्ध सीआयडीने दोषारोपपत्र ठेवले. कराड हाच देशमुख हत्येमागचा मास्टरमाईंड असल्याचे सिद्ध झाले.

7 जानेवारीलाच राजीनामा तयार होता

कराड याला अटक झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. त्यानुसार मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन 7 जानेवारीला राजीनामा पत्र सोपविल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आरोप झाले म्हणून तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा घेतला तर त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतील. महायुती सरकार म्हणून ते परवडणारे नाही. सीआयडी, एसआयटी आणि पोलीस यांच्याकडून सुरू असलेल्या तपासाचा एक तरी अहवाल येऊ दे तोपर्यंत थांबण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता दिसताच स्वतःच्या राजीनाम्याचे उदाहरण देऊन मुंडे यांच्या राजीनाम्याचे सुतोवाच केले होते.

दाग अच्छे है…मुंडे-कोकाटे सच्चे है

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातील फोटोच विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज झळकावले. दाग अच्छे है..मुंडे-कोकाटे सच्चे है, आकाचा आका…महायुतीचा बोका, महायुतीचा जावई…लाडका कराड, सामान्यांच्या सदनिकांवर डल्ला…महायुतीत घोटाळेबाज मंत्र्याचा कल्ला, घोटाळे करा…क्लीन चिट मिळवा, अशा घोषणांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दुमदुमवून सोडला.

सरकारच बरखास्त केले पाहिजे – आदित्य ठाकरे

गेल्या काही महिन्यांत राजकारण एवढे घाणेरडे झाले आहे, कधी सरपंचांना सांगतात, तुम्हाला फंड देणार नाही, तुम्हाला अधिकार देणार नाही असेही सांगतात. पण हेच सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का? स्वतःच्याच कार्यकर्त्याला ते न्याय देऊ शकत नाहीत का असा प्रश्न विचारत, हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

ही क्रूरता औरंगजेबाचीच – संजय राऊत

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जी क्रूरता केली होती तशीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दिसली असा संताप व्यक्त करतानाच, राज्यकर्त्यांनी देशमुख यांच्या मृत्यूचा खेळ केला, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. समोर आलेल्या गोष्टींमधून किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात, बीडमध्ये घडले हेच दिसतेय आणि हे सर्व आरोपी मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत दाखवून कसे मतदान करू दिले नाही हे सत्ताधाऱयांनी पाहिले होते. त्याचवेळी त्यांची निवडणूक रद्द झाली असती तर आज संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असे संजय राऊत म्हणाले.

अजितदादा म्हणतात, नैतिकतेच्या मुद्द्यावर!

दोषींवर कारवाईची भूमिका आधीपासूनच होती. धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेला धरून आहे, असे अजित पवार गटाने पत्रक काढून स्पष्ट केले आहे.

धनुभाऊ म्हणतात, आजारपणामुळे

काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार

धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ‘प्रोटोकॉल’ सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती, पण त्यांनी ती लपवली, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने मुंडेंना घाम फुटला

मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या समोरच अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांना देशमुख यांची क्रूर हत्या होत असतानाचे फोटो दाखवले. फोटोच इतके क्रूर आहेत, ते पाहूनच संताप येतो मग व्हिडीओ बाहेर आले तर बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात भयंकर पडसाद उमटू शकतात, आधीच या प्रकरणावरून आंदोलने सुरू आहेत, उद्या सरकारसाठी धोक्याचे ठरू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. व्हिडीओबाबत ऐकल्यानंतर मुंडे यांना घाम फुटला होता आणि मग अजित पवार यांनीही त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सागर बंगल्यावर काय घडले…

सरपंच हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि अन्य आरोपींविरुद्ध सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रातील माहितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. सोमवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सागर निवासस्थानी धडक देत मुंडे यांना बोलावून घेतले. अजित पवार यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही बोलावून घेतले आणि राजीनाम्याबाबत चर्चा केली.

या प्रकरणात मुंडे यांचा बचाव करता येणार नाही, त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, नाहीतर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालांना करावी लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणावरून आधीच आंदोलने सुरू आहेत, उद्या सरकारसाठी धोक्याचे ठरू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी सकाळपर्यंत मुंडे यांचा राजीनामा होईल, असे स्पष्ट केले.

महायुती टेन्शनमध्ये

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने महायुती टेन्शनमध्ये आली आहे. महायुतीच्या समन्वय समितीची आज तातडीने बैठक बोलावण्यात आली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मिंधे गटाकडून मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार गटाकडून सुनील तटकरे उपस्थित होते.

संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात माहिती दिली नाही म्हणून विरोधक मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग लावण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांचा सामना कसा करावा? याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

अधिवेशनात विरोधकांच्या प्रत्येक आरोपांना कसे प्रत्युत्तर द्यावे हे ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जाते. मुंडे गेले आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाईल या भीतीमुळे ही बैठक बोलावली असल्याचे समजते.

फडणवीस, अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला – सपकाळ

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं तर पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तत्काळ राजीनाम द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱया या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते हे अत्यंत गंभीर आहे, असे सपकाळ म्हणाले.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती. कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरे जावे लागले नसते. – पंकजा मुंडे, पर्यावरणमंत्री

प्रकरण धसास लावले

देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मिळतो, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली. ते म्हणाले की, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली. आज तो न्याय दिसला. संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीमुळे झाली आहे तर यापूर्वीसुद्धा आपण आरोप केल्याप्रमाणे सातपुडा बंगल्यावरती खंडणीसंदर्भात बैठक झाली होती की नाही याचं धनंजय मुंडे यांनी उत्तर द्यावं. ते मंत्री असोत वा नसोत याचे उत्तर मुंडे यांना द्यावं लागेल. त्याप्रकरणीही एसआयटी चौकशी केली पाहिजे. वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानसुद्धा हलत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, मग संतोष देशमुखांच्या हत्येचं पान मुंडेशिवाय परस्पर कसं हललं, असा सवालही धस यांनी केला.

व़क्त से दिन और रात,
व़क्त से कल और आज
व़क्त की हर शै गुलाम,
व़क्त का हर शै पे राज
आदमी को चाहिए
व़क्त से डर कर रहे
काwन जाने किस घड़ी
व़क्त का बदले मिजाज