बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची सीआयडीकडून नाकाबंदी केली जात असताना दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रकरणामुळे मंत्रिपद गमावण्याची वेळ आल्याने मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये बीड प्रकरणावरून चर्चा झाली असून मुंडे यांनी मला वाचवा, असे गाऱ्हाणे फडणवीसांसमोर मांडल्याची चर्चा सुरू आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक होती. पाच खात्यांमधील पुढील 100 दिवसांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीला मंत्र्यांना बोलवण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे तिथे पोहोचले आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. बंद दाराआड ही भेट झाल्याने चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र मुंडे यांनी बीड प्रकरणातून आपला बचाव करावा अशी विनंती फडणवीसांना केल्याचे सांगण्यात येते.
परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू!‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांचाही या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. तीन आरोपीही अद्याप फरार आहेत. त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. कराडमुळे मंत्रिपद धोक्यात आल्याने मुंडे चिंतेत पडले असून अजित पवार गटामधूनही त्यांच्या बचावासाठी अपेक्षित हालचाली होत नसल्याने एकाकी पडले आहेत. आता केवळ फडणवीसच वाचवू शकतात या उद्देशाने त्यांनी सह्याद्रीवर धाव घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.