धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचे जाळे पसरले आहे. पवनचक्कीसाठीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांचे नाव धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी घेण्यात येत आहे. धाराशिव हा सुसंस्कृत जिल्हा असून बीडसारखी गुंडगिरी धाराशिव जिल्ह्यात नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री करु नये. तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा व प्रकरणाची चौकशी सखोल करावी. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व मदत करणाऱ्या आरोपींना आणि सहआरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी मराठा समाज संघटनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिह्याचा पालकमंत्री होण्यासाठी काही हालचाली सुरू आहेत. बीड येथील अवैध, गुन्हेगारी स्वरुपाची संस्कुती धाराशिव जिह्यात नाही. धाराशिव जिल्हा हा उध्दवराव पाटील, प्रमोद महाजन यांच्या विचाराने प्रेरित असून आपल्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढणार नाही याची काळजी घेत आपण आपली वाटचाल करतो. पवनचक्कीसाठी झालेला संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना गंभीर आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येही असेच पवनचक्कीचे जाळे पसरले आहे. त्यामध्ये अशीच गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना या जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही धाराशिवकर म्हणून हे कदापी होऊ देणार नाही. तसेच या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी गुंड प्रवृत्तीचे सराईत गुन्हेगार असताना यांच्यावर बीड जिह्यातील मंत्री धनंजय मुंडे त्यांचा हस्तक वाल्मीक कराड व बगलबच्चे यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच चौकशी समिती एस.आय.टी जरी नेमली असली तरी त्या एस.आय.टी मध्ये त्यांच्या निकटवर्तीय अधिकारी असल्याचे काल पुराव्यानिशी नमुद केले आहे.
या अधिकाऱ्यांना पथकातून बाहेर काढुन त्यांना सेवेतुन बडतर्फ करावे. या मागणीसाठी समाज आपल्या विरोधातही आंदोलन करायला कोणतीही गय करणार नाही. आरोपी स्वत:हून पोलीसांसमोर हजर होतो, हे आपल्या पोलीस खात्याचे व गृहखात्याचे अपयश आहे, अशी भावना संपुर्ण महाराष्ट्राची झाली आहे. या सर्व आरोपींना पुण्यातून अटक होत आहेत हे देखील संशयास्पद आहे. या प्रकरणातील सर्व पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवत कोणतेही हयगय किंवा चालढकल होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहविभागाचे प्रमुख म्हणुन आपणांकडे करत आहोत.
ही मागणी मान्य होईपर्यंत 7 जानेवारी 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिवसमोर मराठा सेवक आमरण उपोषण करणार आहेत. तरी शासन स्तरावर आपण तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.