अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज नवा बॉम्ब टाकला. धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना सुमारे 162 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दमानिया यांनी केली. ज्यांनी शेतकऱयांचा पैसा खाल्ला त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला.
अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला. त्याचे पुरावेही त्यांनी सादर केले. अंजली दमानिया यांनी सांगितले की, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकऱयांना पैसे देण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले होते. राज्य सरकारलाही ते आदेश बंधनकारक होते, मात्र धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून शेतीसंबंधित उपकरणे, कीटकनाशके आणि खतांची खरेदी केली. शेतकऱयांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून महागात खरेदी केल्या, असे दमानिया यांनी सांगितले.
मुंडे यांनी चढय़ा दराने खरेदी केलेला कृषिमाल
नॅनो युरिया ः 92 रुपये लिटरची बाटली 220 रुपयांना विकत घेतली. अशा 19 लाख 68 हजार 408 बाटल्या खरेदी केल्या गेल्या.
नॅनो डीएफए ः ही अर्धा लिटरची बाटली 269 रुपये होती ती 590 रुपयाने खरेदी केली गेली. अशा 19 लाख 57 हजार 438 बाटल्या विकत घेतल्या गेल्या.
कापूस गोळा करण्याच्या बॅगा ः 577 रुपयांना 20 बॅगा मिळतात, पण त्याला 1250 रुपये दर लावला गेला. अशा 6 लाख 18 हजार बॅगा विकत घेतल्या गेल्या.
बॅटरी स्पेअर ः हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो 2450 रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर 2946 रुपयाला विकला जातो तो 3426 रुपयाने विकत घेतला गेला. अशा 2 लाख 36 हजार 427 बाटल्या खरेदी केल्या गेल्या. एका बाटलीमागे एक-एक हजार रुपये कमावले गेले.
मेटाल्डिहाईड ः गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हे कीटकनाशक प्रभावी ठरते. ते 817 रुपये किलो मिळत असताना मुंडे यांनी 1275 रुपयांना घेतले.
धनंजय मुंडेंची ईडी चौकशी करा
धनंजय मुंडे यांच्या कुकर्मांमुळे सरकारची बदनामी होत असून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन त्यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मुंडे यांचे खाते प्रत्यक्षात वाल्मीक कराड चालवत होता, असा आरोपही त्यांनी केला. मुंडेंनी कृषिमंत्री असताना दिलेल्या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनीही सहमती दिली होती, त्यामुळे सरकारदेखाल या घोटाळय़ात सहभागी आहे का, असा सवालही त्यांनी केला.
अंजली ‘बदनामियां’चे आरोप धादांत खोटे
डीबीटीवरील वितरणात नॅनो खतांसह काही वस्तू वगळून त्या शासनामार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच झाली असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. अंजली दमानिया यांचा उल्लेख अंजली बदनामिया असा करत त्यांनी केलेले आरोप मुंडे यांनी फेटाळून लावले.
अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद आटोपताच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली होती. त्यांच्यात काय बोलणे झाले त्याचा तपशील समोर आला नाही. पण काही वेळाने मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून दमानियांचे आरोप फेटाळले. मागील 59 दिवसांपासून आपली मीडिया ट्रायल सुरू असून खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे व बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम दमानियांनी हाती घेतला आहे, असा प्रत्यारोपही मुंडे यांनी केला. अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नावाखाली केलेले आरोप देखील पूर्णपणे चुकीचे आणि खोटे असून माझ्याशी संबंधित असलेली व्यंकटेश्वरा ही कंपनी थर्मल पॉवर स्टेशन अर्थात महाजनकोकडून एक रुपयाही कमवत नाही, असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.