धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी त्यांच्या गैरधंद्यांसाठी सरकारी सह्याद्री अतिथीगृहाचाही वापर केला. सह्याद्रीवर हे दोघे नोटांची मोजदाद करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याशिवाय कराड याच्यावर कारवाई होणार नाही, असे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कराड आहे असे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, कराडवर 302 चा गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवालही क्षीरसागर यांनी केला. सह्याद्रीसारख्या ठिकाणीही कराड-मुंडे डीलिंग करण्यासाठी बसतात यावरून तुम्हाला सगळय़ा प्रकाराची कल्पना येईल, असे क्षीरसागर म्हणाले.
कराडच्या आदेशावरून हत्या
विष्णू चाटे याने संतोष देशमुख यांची हत्या केली. विष्णू चाटेचे कनेक्शन पूर्णपणे वाल्मीक कराड याच्याशी आहे. त्यामुळे वाल्मीक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. कराडला फाशी झाल्याशिवाय स्थानिक जनता आणि आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘आका’ हाजीर हो!
अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी 14 जानेवारी रोजी संपत असून त्याला सकाळी 11 वाजता केज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अवादा कंपनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या वाल्मीक कराडला केज न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. वाल्मीक कराडलाही इतर आरोपींप्रमाणे मकोका लावण्यात यावा, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे केज न्यायालयात आज काय घडते त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विष्णू चाटेला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी
विष्णू चाटेला न्यायालयासमोर आज उभे केले असता न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. विष्णू चाटे हा खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये आरोपी आहे.