धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन, आज सकाळपर्यंत कराडला मकोका लावा नाही तर आत्मदहन

देशमुख कुटुंब पोलिसांना गुंगारा देऊन सकाळी 10 वाजता पाण्याच्या टाकीवर गेले. धनंजय देशमुख यांनी शिडय़ाही काढून टाकल्या. वैभवी देशमुखही पाण्याच्या टाकीवर गेली. ते पाहून पोलीस हादरले. स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कांवत दाखल झाले पण देशमुख यांनी त्यांचे आश्वासन धुडकावले. चार तास हे आंदोलन सुरू होते. शेजारीच असलेल्या दुसऱया टाकीवर पोलीस उपअधीक्षक कमलेश मीना आणि चेतना तिडके गेले. तेथून त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मनोज जरांगे यांचे आर्जव ऐकून देशमुख कुटुंबीय टाकीवरून खाली उतरले. दरम्यान, वाल्मीक कराडला मकोका लावण्यासह देशमुख कुटुंबाने केलेल्या मागण्या उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण गाव आत्मदहन करेल, असा इशारा गावकऱयांनी दिला.

धनंजय देशमुखांच्या मागण्या

चार तासांच्या थरारक आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांनी आपल्या पाच मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

1) फरार कृष्णा आंधळेला तातडीने अटक करा. 2) वाल्मीक कराडला मकोका लावा. 3) सीआयडी आणि एसआयटीच्या तपासाची माहिती द्या. 4) सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या. 5) निकाल लवकर लावण्यासाठी दोन जबाबदार वकील आणि एक अधिकारी नेमा.

काय म्हणाले धनंजय देशमुख…

सीआयडीकडून ज्यांची चौकशी केली जात आहे, ते लोक बाहेर येऊन आम्हाला धमकी देत आहेत. आरोपींचे पह्टो दाखवत आहेत. पोलिसांनी आमची चौकशी केली नाही. तुमचा कोणावर संशय आहे का हेही विचारले नाही. जी चिठ्ठी सापडली त्याबद्दलही चौकशी झाली नाही. घटनाक्रम विचारला जात नाही. याचा अर्थ असा होतो की, आरोपींनी बाहेर जावे आणि आम्हाला मारावे, त्यांच्या हातून मरण्यापेक्षा आम्हीच मरतो. मी आणि माझ्या कुटुंबासह संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली आहे. न्याय मिळत नसेल तर जगायचे कशाला, असा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. मंगळवार, सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, नसता संपूर्ण गाव आत्मदहन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.