
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या राजीनाम्याचे आम्हाला काय करायचे. आम्ही कधी राजीनाम्याची मागणी केली, आम्ही सरकारकडे फक्त न्याय मागत आहोत, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार केला. नियती या नराधमांना कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातनांचे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र हळहळला. धनंजय देशमुख हे कालपासूनच अस्वस्थ होते. माध्यमांशी बोलतानाही त्यांना अश्रू आवरले नाहीत. मंगळवारी सकाळी मनोज जरांगे-पाटील मस्साजोगमध्ये आले. मनोज जरांगे यांना पाहताच धनंजय देशमुख यांचा बांध फुटला. या नराधमांना नियती कधीच माफ करणार नाही, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचारांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रात्रभर संपूर्ण राज्य तळमळत होते. आजारी असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी सकाळीच मस्साजोग गाठून देशमुख कुटुंबाला धीर दिला. मनोज जरांगे यांना पाहताच धनंजय देशमुख यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. मला आता हे सहन होत नाही, असे म्हणत ते धाय मोकलून रडले.
त्यांनी माझी वाट पाहिली असेल…!
कालपासून मला आमचे बालपण आठवत आहे. गाव आमच्या पाठीशी आहे म्हणून इथपर्यंत आलो, पण पुढची वाट बिकट आहे. संतोषअण्णांवर जेव्हा अत्याचार होत होते तेव्हा त्यांनी माझी वाट पाहिली असेल. पण मी नाही त्यांना वाचवू शकलो. पोलिसांनी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. आरोपींना वाचवण्यासाठी त्यांनी माझ्या भावाचा जीव घेतला, असे सांगतानाही धनंजय देशमुखांना दाटून आले होते.
संतोष देशमुखांच्या हत्येचा बदला घेणार – मनोज जरांगे पाटील
माणुसकीला काळिमा फासणारे यांचे विचार आणि संस्कार आहेत. अत्यंत नीच असणाऱ्या या टोळीला संपवायचे आहे. संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला घेतला जाणार. मग ते सुटून बाहेर येऊ द्या, नाही तर आत सडू द्या. संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले. अत्यंत क्रूरपणे त्यांना संपवले. या लोकांना तांब्याभर पाणीसुद्धा कोणी देऊ नका, असे आवाहन करत धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये केली.