राज्य सरकारने अखेर मंत्र्यांच्या खाते वाटपाच्या महिनाभरानंतर 37 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह गुन्हेगारीमुळे गाजत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावर धनंजय मुंडे यांच्यासह मस्साजोग प्रकरणावरून टीकेची राळ उठवणारे भाजप आमदार सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको – मुंडे
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडे देण्याची केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले.
सुरेश धस यांच्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावे अशी आमची पहिल्यापासून मागणी होती. अजित दादांना बीड जिल्ह्यातील तळागाळातील माहिती असल्याने ते अतिशय योग्य काम करू शकतील, असे धस म्हणाले.