दोन मुलींसह विवाहितेने तलावात उडी मारून जीवन संपवले

दोन चिमुरड्या मुलींना कमरेला बांधून विवाहितेने तलावात उडी टाकून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना धामणी (ता. माण) येथे आज पहाटे उघडकीस आली.

ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय 25), स्वरांजली स्वप्नील चव्हाण (वय 6) व शिवानी स्वप्नील चव्हाण (वय 3 महिने) अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

स्वप्नील बापूराव चव्हाण (वय 30) यांचा ऐश्वर्या हिच्याशी सहा वर्षांपूर्वी कराड येथे विवाह झाला होता. त्यानंतर ते माण तालुक्यातील चव्हाणवस्ती येथे राहत होते. स्वप्नील हा गवंडीकाम करून पत्नी व तीन मुलींचा सांभाळ करीत होता. या कुटुंबाचा संसार सुखाने सुरू असतानाच पत्नी ऐश्वर्या यांनी सोमवारी (21 रोजी) मध्यरात्री घराशेजारी असलेल्या तलावामध्ये स्वरांजली व शिवानी या आपल्या दोन मुलींना स्वतःच्या कमरेला बांधून उडी टाकून आत्महत्या केली. ऐश्वर्या हिची तीन वर्षांची तिसरी मुलगी ही आजीजवळ झोपली होती, त्यामुळे ती वाचली. आत्महत्येच्या घटनेने माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पती स्वप्नील बापूराव चव्हाण यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर म्हसवड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. म्हसवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करीत आहेत.