संकटांचे निर्दालन करणारी असा नागोठण्याच्या जोगेश्वरी मातेचा महिमा पंचक्रोशीत आहे. त्यामुळे या ठिकाणी नऊ दिवस अखंड भक्तीचा गजर घुमतो. शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने येथे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रीच्या काळात विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने भाविक येतात. तीन तळ्यांच्या मध्ये सुंदर जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे. मंदिरामध्ये जोगेश्वरी माते सह भैरवनाथ व वाघेश्वर महाराज विराजमान आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे हे ऐतिहासिक ठिकाण असून शहाराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुरातन असलेले रामेश्वर मंदिर, मारुती मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, नवीन रामेश्वर मंदिर, दत्त मंदिर, मरीआई मंदिर, ज्ञानेश्वर मंदिराबरोबरच शहराची ग्रामदैवत जोगेश्वरी माता ही तीन तळ्यांच्या मध्यभागी भव्य मंदिरात वास्तव्य करीत आहे. मंदिरामध्ये जोगेश्वरी मातेसह भैरवनाथ महाराज व वाघेश्वर महाराज स्थानापन्न आहेत. जोगेश्वरी मातेच्या पालखी उत्सवासह नवरात्रही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही नवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिर, प्रांगणात व तीन तळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
भक्तीचा जागर
दररोज जोगेश्वरी माता, भैरवनाथ व वाघेश्वर महाराज यांना नवनवीन वस्त्रे व दागदागिने परिधान केले जातात. त्याचप्रमाणे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ, महाआरती तसेच वेगवेगळ्या आळींचा गरबा नृत्य झाल्यानंतर रात्री कीर्तन तसेच जागरचा कार्यक्रम होत असतो. देवस्थानचे मानकरी पोवळे कुटुंबीय आहेत. विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन व विश्वस्त दिलीपभाई टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटीचे अध्यक्ष नितीन राऊत काम पहात आहेत.