Mahakumbh 2025 : महाकुंभाचा अखेरचा दिवस, सकाळी सात पर्यंत 41 लाख भाविकांनी केले अमृतस्नान

मकरसंक्रांतीला म्हणजेच 13 जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याचा आज अखेरचा दिवस आहे. महाशिवरात्रीनिमित्त आज झालेल्या अमृतस्नानात सकाळी सात पर्यंत 41 लाख भाविकांनी त्रिवेणी संगमावर डुबकी घेतली आहे. आतापर्यंत गेल्या 45 दिवसात महाकुंभात 65 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले.

तब्बल 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते. मकरसंक्रांती ते महाशिवरात्री दरम्यान होणाऱ्या महाकुंभांत तब्बल 50 कोटी भाविक पवित्र स्नान करतील असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला होता. मात्र प्रत्यक्षात हा आकडा आता 65 लाखापर्यंत पोहोचला आहे.

त्रिवेणी संगमा जवळ असलेल्या शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच महाकुंभात स्नान करून अनेक भाविक सध्या वाराणसीतील ज्योतिर्लिंग असलेल्या काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यायला जात आहेत. काशी विश्वनाथ मंदिरात तब्बल पाच ते सहा तास रांगेत उभे राहिल्यानंतर भाविकांना देवाचे दर्शन होत आहे. त्यासोबत वाराणसीतील कालभैरव मंदिरातही गर्दी झाली आहे.