देहूनगरीत उदंड भाविकांच्या साक्षीने रंगला बीज सोहळा

भाविकांच्या मुखातून निघणारा तुकोबारायांच्या नामाचा अखंडीत जयघोष… लाखो वैष्णवजनांच्या मांदीयाळीने फुलून गेलेला इंद्रायणीचा तीर… त्यातच कीर्तन-प्रवचनांचा जागर… टाळ, मृदंगाचा गजर.. अन् वीणेचा, एकतारीचा झंकार… अशा भक्तीमय वातावरणात देहूनगरी न्हाऊन निघाली होती. दुपारी बारा वाजता मध्यान्हाची वेळ होताच ‘नांदूरकी’च्या पानांची सळसळ झाली आणि ‘याचि देही याची डोळा’ उपस्थितांनी यंदाचा अभूतपूर्व असा संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा अनुभवला.

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा 375 वा बीजसोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक रविवारी (दि. 16) देहूनगरीत इंद्रायणी तिरावर गोळा झाले होते. राज्यातील विविध भागांतून शनिवारी सायंकाळीच दिंडय़ा आणि वारकरी दाखल झाले होते. श्री क्षेत्र देहूनगरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर भक्तगणांनी गजबजले होते. पहाटे चार वाजल्यापासूनच मुख्य मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मुख्य देऊळवाडय़ात काकडआरती झाली. त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष हभप पुरूषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते पहाटे पावणेपाच वाजता देऊळवाडय़ातील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरामध्ये, साडेपाच वाजता शिळा मंदिरामध्ये त्यानंतर वैकुंठगमन मंदिर येथे महापुजा करण्यात आली.