महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा करीत कार्तिकी सोहळ्याचा आनंद लुटला. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शविली. यामुळे पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. मठ, मंदिर, संस्थाने, 65 एकर येथील भक्तिसागरातील तंबू, राहुटय़ांमधून भजन, कीर्तन व प्रवचनाच्या गजराने भाविक दंग झाले.
कार्तिकी सोहळ्याला लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा व संस्थाने गजबजून गेली आहेत. 65 एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागातही भाविक राहुटय़ा, तंबू उभारून वास्तव्यास आहेत. भजन, कीर्तन, प्रवचनात महाराज मंडळी, तर ऐकण्यात भाविक दंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कार्तिकी यात्रेला पंढरपूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी आहे. असंख्य भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तितकीच गर्दी रांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आहे. मंदिर समितीच्या वतीने उभारलेल्या दर्शन रांगेत एकादशी दिवशी सुमारे 1 लाखांवर भाविक प्रतीक्षा करीत होते.