लाखो भाविक साई चरणी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर गोव्यासह राज्याच्या विविध भागातून पालखीबरोबर आलेल्या साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

रविवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 5.15 वाजता ‘श्रीं’ची काकड आरती झाली. त्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली.

सकाळी 6.20 वाजता ‘श्रीं’चे मंगलस्नान झाले. सकाळी 7 वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्निक ‘श्रीं’ची पाद्यपूजा केली. सकाळी 8 वाजता लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व मालती यार्लगड्डा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर साईभजन, ‘श्रीं’च्या मध्यान्ह आरती, भजनसंध्या कार्यक्रम, कीर्तन कार्यक्रम झाला. सायंकाळी 7 वाजता ‘श्रीं’ची धुपारती झाली. त्यानंतर भजन संध्याचा कार्यक्रम, ‘श्रीं’च्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान उत्सवाच्या सांगतादिनी सोमवार, 22 जुलै रोजी पहाटे 5.05 वाजता ‘श्रीं’चे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.50 वाजता ‘श्रीं’ची पाद्यपूजा, सकाळी 7 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी 10 ते 12 वाजता या वेळेत गोपालकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.  रात्री 10 वाजता ‘श्रीं’ची शेजारती होईल.

n गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईभक्तांना शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे, याकरिता श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साई आश्रम व भक्तनिवास येथे देणगी स्वरूपात आलेल्या नवीन अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर प्लाण्टचे उद्घाटन करण्यात आले.