मुंबई महापालिकेने या वर्षीच्या गणेशोत्सवापासून ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्प साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण सुविधा तसेच गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी भाविकांना मुंबईतील सर्व कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. यंदा कृत्रिम तलावांची संख्या 200 पेक्षा जास्त वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘क्यू आर कोड’द्वारे देखील भाविकांना, गणेशभक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यूआर कोड’ श्री गणेश मूर्तिकारांच्या मंडपा बाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे मुंबईकर गणेशभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.