श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. यामुळे मंदिराला पूरातन रुप प्राप्त होणार आहे. या कामात भाविकही हातभार लावत आहेत. विठ्ठल भक्ताने विठ्ठल मंदिरात 30 किलोचा चांदीचा वजनी दरवाजा दान केला आहे. संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजाला यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराला चांदीची झळाळी मिळणार आहे.
पंढरी नगरीत सध्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान, नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. त्यासाठी 30 किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास 30 लाख रूपये आहे.
शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व.जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे. अरगुलकर परिवार हे श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. त्यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण होणार आहे.