पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत गुदमरुन भाविकाचा मृत्यू; चेंगराचेंगरीत 400 जण जखमी

पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेत उसळलेल्या भाविकांच्या महासागरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 400 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत आज संध्याकाळी रथ ओढण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. याच वेळी उसळलेल्या गर्दीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अनेकजण जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पुरीतील रथयात्रेतील महाकाय रथ ओढण्याच्या कार्यक्रमास सायंकाळी 5.20 च्या सुमारास सुरुवात झाली. याचवेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला, असे काहीजणांनी सांगितले. ही घटना पुरीच्या ग्रँड रोड बडा दांडावर घडली, जिथे भव्य मिरवणूक सुरू होती. परंपरेने मिरवणुकीचे अग्रभागी असलेल्या भगवान बलभद्रांचा रथ ओढत असताना चेंगराचेंगरी झाली.