
तामिळनाडूमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. रामनाथपुरम जिल्ह्यातील एका मंदिरात उत्सवादरम्यान जळत्या निखाऱ्यांनी भरलेल्या खड्यात पडून एका 56 वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला. केशवन असे मयत भाविकाचे नाव आहे. कुयावनकुडी येथे निखाऱ्यावर चालण्याच्या विधीदरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रामनाथपुरम जिल्ह्यातील कुयावनकुडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे सुब्बैया मंदिर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात प्रथेप्रमाणे थीमिझी थिरुवझा हा विधी पार पडतो. या विधीमध्ये नवस पूर्ण करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक जळत्या निखाऱ्यांवरुन अनवाणी चालतात.
केशवन हे देखील या विधीत सहभागी झाले होते. विधीदरम्यान निखाऱ्यांवरुन धावताना केशवन हे निखाऱ्यांच्या खड्ड्यात पडले. बचाव पथकाने तात्काळ धाव घेऊन केशवन यांना बाहेर काढले. केशवन गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रामनाथपुरम जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.