Sindhudurg News – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, जबरी चोरीतील आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात

देवगड पोलीस स्थानक हद्दीत चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोराने आचरा-देवगड या रस्त्यावर एका महिलेचा मोबाईल आणि रोख रक्कम रस्त्यात अडवून लंपास केली होती. याप्रकरणी बऱ्याच दिवसांपासून चोराचा शोध घेतला जात होता, अखेर आज त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून महिलेचा मोबाईल आणि 6,800 रुपये ही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सदर घटना 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.45 च्या दरम्यान आचरा-देवगड या रोडवर घडली होती. फिर्यादी प्रिया रामदास निकम या आचरा येथे साफसफाईचे काम करून घरी जात होत्या. याच दरम्यान आरोपीने दुचाकीवरून येत त्यांची वाट अडवली आणि त्यांच्या फिशवीतून मोबाईल व रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाला. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पथक नियुक्त करण्यात आले होते. परंतु आरोपी वारंवार पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु 20 जानेवारी रोजी तपासादरम्यान गोपनीय बातमीदारांकडून संशयीत आरोपी हा नालासोपारा येथून खाजगी बसने कुडाळ येथील ओरोस खर्येवाडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओरोस खर्येवाडी येथील बस स्टॉपजवळ सापळा रचला होता. सकाळी (21 जानेवारी 2025) 7 च्या दरम्यान आरोपी बसमधून खाली उतरला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याची चौकशी केली असता चोरून नेलेले मोबाईल आणि रोख रक्कम सापडली.

सदरची कारवाई राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग व समीर भोसले, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकी पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व आशिष जामदार यांचे विशेष पथकाने केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास देवगड पोलीस करीत आहेत.