देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; आधी आदळआपट… रुसवेफुगवे… नको नको म्हणत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

आझाद मैदानावर झालेल्या सोहळ्यात महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्याच वेळी आधी मुख्यमंत्रीपदासाठी आदळआपट करणारे आणि नंतर गृह खात्यासाठी रुसवेफुगवे धरणारे मिंधे गटाचे सरदार एकनाथ शिंदे नको नको म्हणत उपमुख्यमंत्री बनले. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाचा षटकार ठोकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी सोहळा झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार हे सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. अजित पवार 1999 मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले होते. 2010 मध्ये दुसऱ्यांदा त्यांना उपमुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. 2019 ते 2024 या कालावधीतील राज्यात स्थापन झालेल्या तीन सरकारांमध्येही त्यांनी उपमुख्यमंत्री भूषवले होते. आज सहाव्यांदा त्यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आली.

शिंदेंना शपथ घेताना राज्यपालांनी थांबवले

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून अशी सुरुवात केली. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळे, महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने बोलत होते तेव्हा राज्यपाल पी. सी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांना मध्येच थांबवले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शपथेचा छापील मजकूर वाचला.

शपथविधी महायुतीचा, पण भाजपचा वरचष्मा

आझाद मैदानावर आयोजित केलेला शपथविधी सोहळा हा महायुतीचा असला तरी संपूर्ण शपथविधी सोहळ्यावर भाजपचाच वरचष्मा होता. अगदी व्यासपीठावरील भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून भाजपच्याच कार्यकर्त्यांचे वर्चस्व दिसून येत होते. देवाभाऊच्या घोषणा, देवाभाऊची गाणी आणि सर्वत्र भाजपचे झेंडे असे चित्र पाहायला मिळाले.

मोदींचे शिंदेंकडे दुर्लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर आले आणि तडक फडणवीस यांच्या दिशेने निघून गेले. अलीकडे एकनाथ शिंदे उभे होते. त्यांनी आसनस्थ होण्यासाठी मोदींना खुणावण्याचा प्रयत्न केला मात्र मोदींनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. ही बाब पॅमेऱ्यांनी टिपली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शपथविधी सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू , अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अभिनेते शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंह, माधुरी दीक्षित उपस्थित होते.

निमंत्रितांना गुजरातचे पाणी

या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या निमंत्रितांना मॅनिफेस्ट द चेंज या टेट्रापॅकमधील पाण्याच्या बाटल्या वितरीत करण्यात आल्या. या अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 69 रुपये होती. ही कंपनी गुजरातच्या राजकोटमधील आहे.

मित्राची अनुपस्थिती

या सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी, अनिल अंबानी, कुमारमंगल बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, मर्चंट कुटुंबीय असे दिग्गज उद्योगपती उपस्थित होते. पण सरकारचे लाडके उद्योगपती मित्र गौतम अदानी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता.

शिंदे बटें नहीं थे, फिर भी कट गए!

एकनाथ शिंदे यांचे पंख छाटून त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने त्यावर आप आणि समाजवादी पक्षाने तोंडसुख घेतले. ‘एकनाथ शिंदे हिंदू भी हैं, बटें भी नहीं थे, फिर भी कट गए,’ असे ट्विट सपाचे प्रवक्ते मनोज यादव आणि आपचे खासदार संजय सिंह यांनी केले.

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या कालावधीत पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते 72 तासांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचे ते 21 वे मुख्यमंत्री आहेत.

लाडक्या बहिणींना निकषाबाहेर दिले त्याचा पुनर्विचार होणार, 2100 रुपयांसाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा निधी दीड हजार रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती; पण या वाढीव मदतीसाठी लाडक्या बहिणींना पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याशिवाय या योजनेतील अर्जांची छाननी होणार आहे. निकषात न बसणाऱ्या लाभार्थीं महिलांच्या अर्जांचा पुनर्विचार होईल अशी माहिती नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.