कोकाटेंचे बदल्यांचे अधिकार फडणवीसांनी काढले, कृषी खात्यातील मनमानीला चाप

वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मनमानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे. कृषी विभागातील बदल्यांचे माणिकराव कोकाटे यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी काढून स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचे पंख कापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी रेटली होती.

मध्यंतरी माणिकराव कोकाटे यांनी पीए-पीएसच्या नियुक्त्यांवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. आमचे पीएस-ओएसडीदेखील मुख्यमंत्रीच ठरवतात. आमच्या हातात काही राहिलेले नाही. जास्त मस्ती कराल तर घरी जाल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दम दिला होता. आता फडणवीस यांनी कृषी खात्याकडे लक्ष वळवले आहे. कृषी खात्यांमधील बदल्या आणि अन्य कामांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी बदल्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देत बदल्यांसंदर्भात नवे निकष जारी केले आहेत.

कृषी संचालकांच्या बदल्यांचे अधिकार पहिल्यापासून मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. बदल्यांच्या संदर्भात नवीन आदेश जारी करताना कृषी संचालकांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवले आहे. कृषी सहसंचालक आणि अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कृषिमंत्र्यांना होते. आता या दोन्ही दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे कृषिमंत्र्यांचे अधिकार काढून मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेऊन कोकाटेंना धक्का दिला आहे.

इतर बदल्यांवरही मुख्यमंत्र्यांची ‘नजर’

कृषी विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रशासन अधिकारी यांच्या मध्यावधी बदल्यांसाठी कृषिमंत्री सक्षम प्राधिकरण असले तरी गट ‘अ’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यावधी बदल्या करताना मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणे आवश्यक राहणार आहे.