सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘कोण कोणाला भेटले, यावर…’

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस आणि मुंडे भेट झाली. या भेटीला बावनकुळेंसह धस यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे धस यांच्यावर टीका होऊ लागली, तसेच दोघांमध्ये समेट तर झाला नाही ना, असा संशयही व्यक्त होऊ लागला. यावार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तत्पूर्वी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केले होते.

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. याउलट जाऊन फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोण कोणाला भेटले यावरून राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद सुरू रहायला हवा.

मस्साजोग प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी खंबीर भूमिका घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. अशा प्रकारे खंबीर भूमिका घेत असताना कोणाशी संवात सोडून टाकायचा असे करण्याची आवश्यकता नाही. धनंजय मुंडे राज्याचे मंत्री असून एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर कोणताही फरक पडत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

आमदार धसांनी मुंडेची भेट घेणे योग्य नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केले मत