शेतीसाठी मोफत वीज डिसेंबरपर्यंत शक्य नाही

शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे संकेत वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले.

शेतीसाठी १२ तास विजेची मागणी होती. या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून, डिसेंबर २०२६पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षांत वीज बिल कमी

राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बिल दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरू केली आहे. येत्या पाच वर्षांत राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.