
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशातील, राज्यातील सद्यस्थितीवर मत व्यक्त केले. तसेच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्यांनी संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून घ्यावे, असा सणसणीत टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
नाशिकला लवकरच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागीय शिबीर होणार आहे. त्यासंदर्भात पाहणी आणि आढाव घेण्यासाठी आपण नाशिकमध्ये आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकमध्ये पाय ठेऊ देणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना नाशिकमध्ये पाय ठेवू देणार नाही, असं आमचे लोक का म्हणाले, याचं आत्मचिंतन भाजपने करण्याची गरज आहे. नाशिकबाबत त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, जी आश्वासनं त्यांनी दिली होती, त्याचे काय झाले? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासनं सत्ता आल्यानंतर पूर्ण झाली का? असे आमचे नेते विचारणा करत असतील, तर त्यात काय अयोग्य आहे, असेही ते म्हणाले. दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने जनतेच्या मनात संताप आहे. त्यातच मुख्यमंत्री फौजफाट्यासह येतात आणि नाशिकला भेट देत निघून जातात, त्यावर आमच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं लागेल, त्यासाठी संविधान वाचावं लागेल समजून घ्यावं लागेल. याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीचे नेते तुरूंगात गेले होते. इंदिरा गांधी टिका सहन करत नाही, इंदिरा गांधी कुणाला बोलू देत नाहीत, इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज दाबताहेत याकरता अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तुरुंगात गेले होते. याची देवेंद्र फडणवीस यांनी आठवण ठेवावी, असेही संजय राऊत यांनी सुनावले.
गद्दारांना गद्दार नाही तर काय म्हणायचे. त्यांनी जी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे. बेईमानाला बेईमान म्हणायचं नाही, तर काय म्हणायचे, याबाबत त्यांनी नवी डिक्शनरी तयार केली आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला. रिक्षावाल्याला रिक्षावाला नाही म्हणायचं तर काय म्हणायचे. गद्दार गुवाहाटीला पळून गेले, आता तो इतिहास बदलायचा आहे का. या सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत. तसेच याबाबतचे सत्य जनतेलाही माहिती आहे. एखादा कलाकार कलेतून हे मांडत असेल तर त्यात अयोग्य काय आहे, त्याबाबत चिंता वाटण्याचं कारण नाही, असेही ते म्हणाले.