मोदींनी सत्कार केलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचं घाणेरडं विधान, CM देवेंद्र फडणवीस यांनी दिला कारवाईचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झालेला युट्यूबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादिया याने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्रामवर त्याला भयंकर ट्रोल केले जात आहे.

घाणेरड्या विधानामुळे त्याच्यासह सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर अपूर्व मखिजा, कॉमेडियन समय रैना आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात एक पत्र मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाला पाठवण्यात आले असून सर्व आरोपींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

रणवील अलाहाबादिच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, ‘मला याबाबत जास्त माहिती नाही. मी ते विधान अद्याप ऐकलेले नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करतो तेव्हा आपलेही स्वातंत्र्य संपते. समाजात आपण काही नियम बनवलेले आहेत. जर कुणी हे नियम मोडले असतील आणि चुकीचे वागले असतील तर त्यांच्यावर कारवाई होणारच.’

टिकैत यांचा पंतप्रधानांवर निशाणा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशात मनोरंजन आणि कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात असून सरकार ढिम्म आहे. सरकारला ना शेतकऱ्यांची काळजी आहे, ना हिंदुस्थानी संस्कृतीची आणि पंतप्रधान अशा लोकांना पुरस्कार देतात. अशा लोकांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी, अशी मागणी टिकैत यांनी ट्विट करत केली आहे.

2024 मध्ये मोदींनी केलेला सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये युट्यूबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादिया याचा पुरस्कार देऊन सत्कार केला होता. मोदींच्या हस्ते रणवीरला ‘डिसरप्टर ऑफ द ईयर’ हा पुरस्कार मिळाला होता.