संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची तसेच परभणीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याखाली कारवाई करण्यात येईल. कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली. तर परभणीत पोलिसी बळाचा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
बीड आणि परभणीतील घटनेच्या प्रकरणी विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तरात दोन्ही प्रकरणांच्या सविस्तर घटनाक्रमाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी सविस्तर माहिती दिली. बीडच्या सरपंचांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई होणार असून या घटनेची पोलीस महानिरीक्षकांच्या अंतर्गत एसआयटी नेमून तसेच तेथील संपूर्ण परिस्थितीची न्यायालयीन चौकशी केली जाईलही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण होईल. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सरकारच्या वतीने 10 लाख रुपयांची मदत घोषित केली.
बीडमधील अराजक संपवणार
मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. केवळ संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते हे प्रकरण मर्यादित नाही तर या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील. तसेच बीड जिह्यात निर्माण झालेली कायद्याच्या कमतरतेची परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. त्यामुळे बीडमध्ये ज्याप्रकारे अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे ते अतिशय चुकीचे आहे. यात पोलिस प्रशासनाचादेखील दोष असून यापुढे असा निर्ढावलेपणा सहन केला जाणार नाही. बीड जिह्यात अशा प्रकारे गुन्हेगारी करणाऱ्यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू. या गुह्यात कलम 302 लागेलच. पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांवर एकत्रितपणे मकोका लावण्यात येईल.
या गुह्यात प्रत्यक्षपणे कुणी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना संघटित गुन्हेगारीचा भाग समजून मोकामध्ये टाकण्यात येईल. बीड जिह्यातील वाळूमाफिया आणि भूमाफियांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत एक मोहिम हाती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
बीडच्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या घटनेचा सूत्रधार कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. वाल्मिक कराड हा या गुह्यात दोषी आढळला तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्याचे कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल, अशी निःसंदिग्ध ग्वाही फडणवीस यांनी दिली.
परभणीच्या घटनेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीतील पोलिसांच्या मारहाणीने झालेला नाही. पोलीस कोठडीतील व्हिडिओ फुटेजमध्ये त्याला मारहाण झाल्याचे आढळून आलेले नाही असे फडणवीस यांनी सांगितले.
विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तरानंतर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी बोलण्याची परवानगी मागितली.मात्र, अध्यक्षांनी परवानगी नाकारल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला.