मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिलांवर त्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांकडून बलात्कार आणि लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार सोशल मीडियावरून समोर आला होता. मात्र तसे काहीच घडले नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.
शिवसेना आमदार वैभव नाईक, सुनील राऊत, रमेश कोरगावकर आणि डॉ. राहुल पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. लैंगिक अत्याचाराचा असा कोणताही प्रसंग घडलेला नाही. आठ महिला पोलिसांच्या बनावट सहीचा वापर करून बनावट तक्रार अर्ज सोशल मीडियावर प्रसारित केला गेला आणि त्या माध्यमातून महिला पोलिसांची बदनामी व फसवणूक केली गेली. या आठपैकी एका महिला पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. त्याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.