![eknath shinde](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/eknath-shinde--696x447.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून एकनाथ शिंदे यांना अनेक धक्के दिले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी शिंदे यांनी सुरू केलेली एक योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केलेली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवले जात होते. मात्र आता राज्याच्या तिजोरीवरील वाढता भार कमी करण्यासाठी फडणवीस यांच्या सरकारकडून बंद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आनंदाचा शिधा ही योजना देखील थांबविण्याचा विचार असल्याचे समजते.
लोकसभा निवडणूकीत फटका बसल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येकी 1500 रुपये दर महिना देण्यात येत होते. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरी मोठ्या प्रमाणात रिकामी झाली. त्यामुळे आता फडणवीस सरकारकडून काही योजना बंद केल्या जात आहेत.